मुंबई : कोस्टल रोडच्या कामात ऑक्टोबर, २०१८ ते डिसेंबर, २०२० या काळात सुमारे १ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे नेते आ. आशिष शेलार यांनी सोमवारी केला. या प्रकरणाची एसआयटीमार्फत मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.कोस्टल रोडच्या ‘टप्पा एक’मधील भरावासाठी लागणारा दगड व साहित्य हे शासनाच्या परवानाधारक खाणीतून न उचलता, ते अन्य ठिकाणांहून उचलल्याने कंत्राटदार कंपनीने सरकारला रॉयल्टीतून मिळणाऱ्या ४३७ कोटींची अफरातफर केली आहे. निविदेतील अटींपेक्षा उच्च घनतेच्या व कमी दर्जाच्या भराव साहित्याचा वापर करून, पालिकेकडून अतिरिक्त रुपये ४८.४१ कोटी वसूल केेले आहेत. पालिकेचे हे नुकसान का केले, असा सवाल शेलार यांनी केला.
शेलार म्हणाले की, कोस्टल रोड कंत्राटदाराने भराव सामग्रीची वाहतूक करताना बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी महाराष्ट्र पोलीस वाहतूक विभागाने आकारलेला दंड सुमारे ८१.२२ कोटी रुपये का भरण्यात आला नाही? हा दंड माफ करून, यामध्ये कोणी कमिशन घेण्यासाठी काही षडयंत्र रचते आहे का, तसेच ३५ हजार बोगस फेऱ्या दाखवल्याची माहिती आमच्याकडे आहे. कंत्राटदारांनी पुरवलेल्या निकृष्ठ दर्जाचे साहित्य वादळांमध्ये वाहून गेले ते नुकसान पालिकेकडून वसूल केले का, साहित्यामुळे पालिकेचे १७.८६ कोटी रुपयांचे नुकसान का केले, असा सवालही शेलार यांनी केला.
या रोडच्या टप्पा १ मधील कामांत महाराष्ट्र सरकार व पालिकेची ६८४ कोटींची फसवणूक झाल्याचे दिसते आहे. डिसेंबर, २०२० नंतर आजपर्यंत अतिरिक्त २३ लाख टन पुनर्प्राप्ती भरण्याचे साहित्य वापरले गेले आहे व वरीलपैकी बहुतेक बेकायदेशीर गोष्टी अजूनही होत असल्याने, एक हजार कोटीच्या आसपास घोटाळे झाल्याची शक्यता आहे, असे शेलार म्हणाले.