लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई: एलएलबीच्या अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रम म्हणजे एलएलएमच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याचा कल वाढला आहे. मुंबई विद्यापीठात फक्त ६०० एलएलएमच्या जागा उपलब्ध असताना एलएलएमच्या प्रवेश परीक्षेसाठी २ हजार ८०२ हून अधिक अर्ज दाखल झाले आहेत.एलएलबीचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. गेल्यावर्षी एलएलएम अभ्यासक्रमासाठी १ हजार ७०० विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. यंदा मात्र हा आकडा ३ हजाराच्या घरात गेला आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रवेश परीक्षा घेतली जाते. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत २८०२ हून अधिक विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. राज्यात फक्त मुंबई विद्यापीठामार्फत विधी शाखेतील पदव्युत्तर अभ्यासक्रम चालवला जातो. यामुळे राज्यातील अन्य विद्यापीठातील विद्यार्थीही विद्यापीठात प्रवेशासाठी येतात. या अभ्यासक्रमासाठी असलेल्या सहा विषयांसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. एलएलबीनंतर दोन वर्षांच्या कोर्समध्ये भारतीय घटना, फौजदारी कायदा व प्रक्रिया, पर्यावरण, बौद्धिक संपदा, बौद्धिक संपदा आणि मानवाधिकार असे विषय शिकवले जातात. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमामुळे सध्या तरी जागा वाढवणे शक्य नाही. विद्यार्थ्यांचा कल वाढल्यास त्यांना जागा वाढवण्यासाठी महाविद्यालयीन स्तरावर हा कोर्स सुरू करण्याची गरज असल्याचे मत मुंबई विद्यापीठ विधी प्रबोधिनीचे संचालक डॉ. अशोक येंडे यांनी सांगितले.
एलएलएम प्रवेशासाठी हजारो अर्ज, ६०० जागा : एलएलएमच्या प्रवेशाचा मार्ग खडतर
By admin | Published: May 25, 2017 12:41 AM