ठाणे : अनधिकृत बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी ३० लाखांपैकी पहिला हप्ता म्हणून साडेतीन लाखांची लाच स्वीकारणा-या ई-विरार महापालिकेच्या सहायक आयुक्तासह दोघा शिवसैनिकांना ठाणे लाचलचुपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. नालासोपाऱ्यातील अनधिकृ त बांधकामांवर कारवाई न करण्यासाठी त्यांनी ही मागणी केली होती. तसेच त्यांनी त्या विकासकाकडून साडेपाच लाख रुपये घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.जितेंद्र चौधरी, अरविंद तोडणकर आणि प्रवीण म्हाप्रळकर अशी अटक करण्यात आलेल्या लाचखोरांची नावे आहेत. या तिघांनी एका बांधकाम विकासकाकडून नालासोपारा येथील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी ३० लाखांची मागणी केली होती. पहिला हप्ता म्हणून साडेतीन लाख रुपयांची लाच स्वीकारताना मंगळवारी रात्री अरविंद तोडणकर याला नालासोपारा, निर्मला बिल्डिंगजवळ रंगेहाथ पकडले. त्यानंतर, इतर दोघांना अटक केली आहे. चौधरी हा वसई-विरार महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचा प्रभारी सहायक आयुक्त असून तो तत्कालीन नगर परिषदेत वरिष्ठ लिपीक होता. मात्र, महापालिकेच्या स्थापनेनंतर त्याची प्रभारी सहायक आयुक्त म्हणून वर्णी लागली होती. म्हाप्रळकर शिवसेनेचा तत्कालीन नगर परिषदेचा माजी नगरसेवक आहे. त्याची दोन वेळा नगर परिषदेवर स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झाली होती. नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीतही त्याने दोन वेळा नशीब आजमावले होते. त्या वेळी त्याचा पराभव झाला होता. तसेच सध्या शिवसेनेचा नालासोपारा मतदारसंघाचा संघटक म्हणून कार्यरत आहे. अरविंद तोडणकर हा शिवसेनेचा नालासोपारा विभागप्रमुख असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास ठाणे लाचलुचपत विभाग करीत आहे़ (प्रतिनिधी)
सहा.आयुक्तासह तिघांना अटक
By admin | Published: September 11, 2014 12:29 AM