लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना अद्यापही पूर्णपणे नियंत्रणात आला नसताना आता मलेरिया, डेंग्यूच्या आजारांनी डोके वर काढले आहे. साचलेल्या पाण्याची डबकी, कचरा, अस्वच्छता यामुळे डेंग्यूच्या आजाराची शक्यता वाढली आहे. राज्यात सध्या डेंग्यूचे १ हजारापेक्षा अधिक रुग्ण असून, गेल्या चार महिन्यांत पाच रुग्ण दगावले आहेत.
मुंबईत डेंग्यूचे ५७ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात ३६ रुग्ण असून, हजारापेक्षा जास्त संशयित आहेत. विदर्भात ३६८ रुग्ण आढळले असून, तीन रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. नागपूरमध्ये १९४, यवतमाळमध्ये ६७, वर्धा येथे ४९, अमरावतीत २५०, चंद्रपूरमध्ये २२, बुलडाणा येथे ७, भंडाऱ्यात ४ रुग्ण डेंग्यूचे आढळले आहेत. मराठवाड्यात डेंग्यूचे ११० रुग्ण गेल्या काही महिन्यांत आढळले आहेत. यातील सर्वाधिक ६८ रुग्ण नांदेड जिल्ह्यात आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात २१, औरंगाबाद जिल्ह्यात १३, परभणी जिल्ह्यात ४ तर बीड आणि लातूर जिल्ह्यांत प्रत्येकी २ रुग्ण आढळले आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात १२४, सांगलीत १२ तर सातारा येथे ९२ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे. रत्नागिरीमध्ये २ तर सिंधुदुर्गमध्ये ६९ रुग्णांची नोंद झाली असून, ठाण्यात १७ रुग्णांची नोंद झाली असून, २ रुग्ण दगावले आहेत. नाशिकमध्ये डेंग्यूबरोबरच चिकनगुनियाचेही ११७ रुग्ण आढळून आले आहेत. जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत डेंग्यूचे तीन रुग्ण आढळून आले आहेत. ही तिन्ही बालके आहेत.
असा होतो प्रसार
डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग असून, एडिस इजिप्ती डासाच्या संक्रमणात्मक चाव्याद्वारे तो प्रसारित केला जातो. एका डासाच्या चाव्यानंतर ५-६ दिवसांनंतर मनुष्याला या आजाराची लागण होते. डेंग्यू ताप हा एक तीव्र, फ्लूसारखा आजार आहे. यामुळे मृत्यूही ओढवू शकतो.
उपाययोजना
- आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी भरलेली सर्व भांडी रिकामी करावी.- पाणी साठवलेल्या भांड्यांना योग्य पद्धतीने व्यवस्थित झाकून ठेवावे.- घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.- घरांच्या भोवताली व छतांवर वापरात नसणारे टाकाऊ साहित्य ठेवू नये.