रस्ते अपघातांत दर महिन्याला एक हजार जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2019 03:52 AM2019-12-08T03:52:05+5:302019-12-08T05:59:46+5:30
दहा महिन्यांत २७ हजार अपघात; १० हजार जणांनी गमावला जीव
मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्याही घटनाही वाढत आहेत. जानेवारी ते ऑक्टोबर, २०१९ या दहा महिन्यांमध्ये २७,३३८ अपघात घडले असून, या अपघात १०,२७२ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवर दहा महिन्यांत २७,३३८ अपघात घडले. या अपघातांमध्ये ९,४६६ अपघात जीवघेणे ठरले असून, यामध्ये १०,२७२ जणांचा मृत्यू झाला, तर १०,१०१ गंभीर अपघात घडले. यामध्ये १५,७७७ जण गंभीर जखमी झाले. याच कालावधीत ४,६४६ किरकोळ अपघात घडले असून, यात ८,२३१ जण किरकोळ जखमी झाले आहेत. अन्य ३,१२५ अपघातांमध्ये कुणाचाही मृत्यू झाला नाही किंवा कुणीही जखमी झाले नाही.वेगाची नशा वाहनचालकांना खुणावते. मात्र याच वेगामुळे अपघात घडतात.बेदरकार वेगासह ओव्हरटेकचा प्रयत्नही अपघातस कारणीभूत ठरत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर ६७ जणांचा बळी
जानेवारी ते ऑक्टोबर, २०१९ या दहा महिन्यांमध्ये मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एकूण २९२ अपघात घडले. यामध्ये ५५ जीवघेणे अपघात घडले असून, ६७ जणांचा नाहक बळी गेला, तर ६० गंभीर अपघात झाले. यामध्ये १४१ जण गंभीर जखमी झाले. अन्य २६ किरकोळ अपघात घडले असून, त्यामध्ये १५१ जण किरकोळ जखमी झाले, तर ६९ अपघातांमध्ये कोणीही जखमी झाले नाही.
वाहनचालकांचा बेदरकारपणा
वाढते अपघात आणि त्यातून होणारी मनुष्यबळाची हानी मोठी आहे. अनेक ठिकाणी वाहन चालविताना बेदरकारपणा दिसत असून, त्यातूनही अनेकांना प्राणास मुकावे लागत आहे. राज्यात २०१७ मध्ये ३६,०५६ रस्ते अपघातात १२,५११ तर २०१८ मध्ये ३५,७१७ अपघातांमध्ये १३,२६१ जणांचा मृत्यू झाला.