जमीर काझी, मुंबईराज्यात पुन्हा राजरोसपणे ‘छमछम’ सुरू झाल्यास तरुणाई या विळख्यात ओढली जाण्याबरोबरच महानगरात गेल्या काही वर्षांपासून थंडावलेले ‘अंडरवर्ल्ड’ पुन्हा सक्रिय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणेवर वाढता ताण पडणार आहे.घरातील कर्ता पुरुष, तरुण डान्सबारच्या व्यसनात अडकल्याने यापूर्वी हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे डान्सबारचे समर्थक ७० हजारांवर महिलांना रोजगार मिळण्याचा आनंद व्यक्त करत आहेत. तथापि, या नादापायी उद्ध्वस्त होणाऱ्या लाखो तरुणांच्या भविष्याबाबत विचार करुन सरकारला कठोर पावले उचलावी लागणार आहेत.साधारण १२-१५ वर्षांपूर्वी डान्सबार राजरोसपणे सुरु असताना शहरातील उद्योगपती, नोकरदार या नादात आकंठ बुडाले होते. इतकेच नव्हे तर पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील सधन शेतकरी कुटुंबातील तरुणांचे गटचे गट सुमो, सफारी आणि अन्य गाड्यातून मुंबईकडे डान्सबारच्या नादापायी वारंवार फेऱ्या मारत असत. या बारशी संबंधित एजंट व दलालांचा धंदा फोफावला होता. एका डान्सबारमध्ये सरासरी ४० ते ६० मुलीचा राबता असे. त्यातील बहुतांश या बांग्लादेशी, यूपी, बिहार आणि कर्नाटकातील होत्या.गिऱ्हाईकांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई, पुण्याबरोबरच डान्सबारचे लोण राज्यातील महामार्गांवर विशेषत: कोल्हापूर, सांगलीसारख्या ग्रामीण भागापर्यंत पोहचले होते. त्यावेळी राज्यात सुमारे ६५० ते ७०० डान्सबार फोफावले होते. त्यात सरासरी ७० हजारांवर तरुणी डान्सगर्ल्स म्हणून काम करीत होत्या. हे बार गुन्हेगार टोळ्यांची भेटण्याची ठिकाणे झाली होती. डान्स बारबंदीनंतरही मुंबई, नवी मुंबईत अनेक ठिकाणी लेडीज सर्व्हिस, आर्केस्ट्राच्या नावाखाली डान्सबार सुरु असल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र चोरुन छुप्या पद्धतीने हा व्यवसाय चालत असल्याने त्याला एक मर्यादा होती. आता सर्वोच्चा न्यायालयाने रोजगाराचा मुलभूत अधिकार हिरावून घेण्याचा अधिकार कोणालाही नसल्याचे स्पष्ट करत त्यावरील बंदी उठविण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुन्हा एकदा तरुणाई व्यसनात डुंबण्यासह वाढत्या गुन्ह्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.
पुन्हा हजारो कुटुंबे उद्ध्वस्त होण्याची भीती!
By admin | Published: October 16, 2015 3:22 AM