हजारोंची शुल्कवसुली, पालकांना पावती नाहीच
By admin | Published: May 15, 2017 06:35 AM2017-05-15T06:35:46+5:302017-05-15T06:35:46+5:30
स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. याचबरोबर मुलांना अन्य कला अवगत असल्या पाहिजेत, असा (गैर)समज गेल्या काही
पूजा दामले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी इंग्रजी भाषा आलीच पाहिजे. याचबरोबर मुलांना अन्य कला अवगत असल्या पाहिजेत, असा (गैर)समज गेल्या काही वर्षांत पालकांच्या मनात रूढ झाला आहे. त्यामुळे वयाच्या तिसऱ्या वर्षापासून सर्व कलागुण संपन्न करणाऱ्या शाळेत मुलांना प्रवेश मिळवून देण्यासाठी, कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ५० हजार ते २ लाख रुपये भरतात. दरवर्षी पूर्व-प्राथमिक शाळांमध्ये सुरू असणाऱ्या कोटींच्या उलाढालीची नोंदच नाही.
मुंबईतील अनेक शाळांमध्ये आता ‘डोनेशन’ म्हणून रक्कम स्वीकारली जात नाही, तर पूर्व-प्राथमिक शाळांत प्रवेशासाठी ‘डिपॉझिट’ घेतले जाते. हे डिपॉझिट दोन प्रकाराचे असते. एक प्रकारचे डिपॉझिट हे मुलाने शाळा सोडल्यावर त्याला परत देतात, पण काही शाळा हे डिपॉझिट परत देणार नाही, असे सांगतात. या डिपॉझिटची पावतीही पालकांना देण्यात येत नाही. काही वेळा ‘डेव्हलपमेंट फंड’ म्हणून पालकांकडून काही हजार रुपये रक्कम आकारली जाते. या रकमेबरोबरच पालकांकडून प्रत्येक महिन्याचे शुल्क वेगळे आकारले जाते, तर हे कमी म्हणून की काय, ‘इव्हेंट’ साजरे करण्यासाठी पैसे घेतले जातात. काही खासगी शाळा या ५० ते १ लाखापर्यंत शुल्क आकारतात. हे शुल्क प्राथमिक शाळांच्या शुल्कापेक्षा अधिक असते. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यातच या शाळांचे प्रवेश सुरू होतात आणि जागा भरतातही, अशी माहिती फोरम फॉर फेअरनेस इन एज्युकेशनचे अध्यक्ष जयंत जैन यांनी दिली.