भांडुपच्या शिवाजी तलावात हजारो मासे मृत
By admin | Published: May 31, 2016 03:31 AM2016-05-31T03:31:07+5:302016-05-31T03:31:07+5:30
मृत मासे, त्याची असह्य दुर्गंधी आणि दूषित पाणी असे दृश्य भांडुपच्या शिवाजी तलावात पाहायला मिळत आहे. रविवारी तलावाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आणि तलावातील
लीनल गावडे, मुंबई
मृत मासे, त्याची असह्य दुर्गंधी आणि दूषित पाणी असे दृश्य भांडुपच्या शिवाजी तलावात पाहायला मिळत आहे. रविवारी तलावाच्या स्वच्छतेच्या कामाला सुरुवात झाली आणि तलावातील हजारो मासे तडफडून मेले. सध्या तलावात मृत माशांचा खच झाला असून, संबंध परिसरात माशांची दुर्गंधी पसरली आहे. त्यातच काही संधीसाधूंनी या दूषित तलावातील मृत मासे विकून कमाई करून घेतली.
भांडुप पश्चिम येथील शिवाजी तलावामध्ये गेले कित्येक वर्षे कचरा, निर्माल्य आणि गाळाचे साम्राज्य होते. परिणामी, या तलावाचे पाणी दूषित झाले होते. भांडुपमधील या जुन्या व मोठ्या तलावाची ही अवस्था पाहून स्थानिकांनी हा तलाव स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडे तगादा लावला. स्थानिकांच्या मागणीचा जोर वाढल्याने अखेर महापालिकेने रविवारी हा तलाव स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली.
रविवारी रात्री यंत्राच्या साहाय्याने तलावातील गाळ उपसण्याचे काम सुरू झाले. परंतु, या यंत्रामुळे तलावात असलेले हजारो मासे घुसळून निघाले आणि तडफडून अखेरचा श्वास घेऊ लागले. त्याचबरोबर या तलावात असलेले कासव, पाणबदक व अन्य जलचरांच्याही जीविताला धोका निर्माण झाला आहे.च्अनेक मासे रात्रीच मेले. सकाळी मृत मासे पाण्यावर तरंगू लागेल आणि परिसरात दुर्गंधी पसरली. या दुर्गंधीमुळे भोवतालच्या परिसरातील स्थानिकांना राहणेही असह्य झाले आहे. सदर तलावाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली, असे येथील एका रहिवाशाने सांगितले.
च्तलाव खोल असून, गाळ पूर्ण निघेपर्यंत हे काम सुरूच राहणार आहे. तलाव स्वच्छ करण्याचे काम आणखी काही दिवस सुरूच राहणार असल्याचे तलाव स्वच्छ करणाऱ्या एका मजुराने सांगितले. पर्यायाने स्थानिकांना आणखी काही दिवस ही दुर्गंधी सहन करावी लागणार आहे. मात्र, काही लोकांच्या हे चांगलेच पथ्यावर पडले. दूषित पाण्यातील मृत मासे ‘ताजे मासे’ आहेत असे भासवत काही संधीसाधूंनी हे मासे बाजारात विकले.स्वच्छता अभियानाचे तीनतेरा
तलाव परिसरात निर्माल्य कलश बसवण्यात आला आहे. पण अनेक रहिवासी अनेकदा सांगूनही निर्माल्य तलावात भिरकवतात. एक-एक निर्माल्य टाकता आता एवढा गाळ तयार झाला आहे. स्वच्छता अभियानाचे निर्माल्य फेकणाऱ्यांनी तीनतेरा वाजवले आहेत. याचा नाहक त्रास माशांना झाला आहे. काल गाळ उपसायला गेल्यानंतर मासे तडफडून मरत होते. - तलावाचा सुरक्षारक्षक
तलाव पुन्हा दूषित
सुशोभीकरण केल्यानंतर संध्याकाळी तलावाकाठी बसायला यायचो. तलावातील विविध जातीचे मासे, पाणकोंबडी, कासव दाखवण्यासाठी लहान मुलांना गेल्या काही महिन्यांपासून आवर्जून घेऊन येत होतो. पण रविवारी रात्री गाळ उपसायला घेतल्यापासून तलावाचे रूपच पालटले. तलावात माशांचा खच पाहून फार वाईट वाटले. काही महिन्यांपूर्वी तलाव स्वच्छ करूनही पुन्हा तीच स्थिती झाल्याचे पाहून वाईटही वाटले.
- नीता कदम, रहिवासीअसह्य दुर्गंधी
भांडुपमध्ये ज्येष्ठ नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी फारच कमी ठिकाणे उपलब्ध आहेत. तलावाच्या सुशोभीकरणाला काही महिनेही उलटले नाहीत आणि पुन्हा तलाव अस्वच्छ करण्यात आला. सकाळी हजारो मृत मासे पाण्यावर तरंगत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने काही तासांतच संबंध परिसरात असह्य दुर्गंधी पसरली. - आत्माराम गावडे, रहिवासी
निर्माल्य फेकणाऱ्यांवर कारवाई करा
आज सकाळी बस थांब्यावर उभे राहणे कठीण झाले होते. मृत माशांची दुर्गंधी इतकी होती की, बसची वाट पाहणे त्रासदायक वाटत होते. ‘स्वच्छ भारत’ अभियानाला लागलेले हे गालबोट आहे. तलावात निर्माल्य फेकणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, कारण त्यामुळेच आज हजारो मासे मेले.
- सुनंदा शिर्के, रहिवासी