मुंबई : काळबादेवी येथील व्यापाºयाचे ६० लाख किमतीचे दागिने घेऊन एक जण पसार झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या प्रकरणी एल. टी. मार्ग पोलिसांनी या ठगाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करून अधिक तपास सुरू केला आहे.काळबादेवी परिसरात जगदीशचंद्र रावल (६०) यांचे सोन्याचे दागिने विक्रीचे दुकान आहे. अन्य सराफांना त्यांच्याकडून दागिन्यांची विक्री केली जाते. अशातच ६० लाख रुपये किमतीचे दागिने विविध व्यापाºयांना विकण्यासाठी आणि त्यांच्याकडून आणखीन आॅर्डर आणण्याची जबाबदारी त्यांनी एकाकडे सोपवली होती. ठरल्याप्रमाणे ७ मे रोजी त्यांनी सर्व दागिने त्याच्याकडे दिले. मात्र ते दागिने संबंधितापर्यंत पोहोचले नसल्याचे १६ मे रोजी रावल यांच्या निदर्शनास आले. त्यांनी त्याच्याकडे याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा फोन नॉट रिचेबल झाल्याने रावलही चक्रावले. त्यांनी दोन दिवस वाट पाहिली. मात्र, काहीच प्रतिसाद न आल्याने यामध्ये आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी शनिवारी एल. टी. मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
व्यापाऱ्याचे ६० लाखांचे दागिने घेऊन ठग पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 1:57 AM