हजारो मजुरांच्या गर्दीने वांद्रे स्टेशनबाहेर गोंधळ; संचारबंदीचे तीनतेरा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:32 AM2020-04-15T05:32:55+5:302020-04-15T05:33:30+5:30
रेल्वे सुरू होण्याची अफवा; पोलिसांचा लाठीमार
मुंबई : कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाउनमुळे उपासमारीची वेळ ओढावलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पोलिसांना तेथे अतिरिक्त कुमक मागवावी लागली. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे येथे स्वयंसेवी संस्था मोफत अन्नधान्य वाटप करीत होती. हे घेण्यासाठी लोक जमले असतानाच तेथे मोठ्या प्रमाणात मजूरही जमू लागले. हीच गर्दी नंतर आम्हाला धान्य नको, गावी जाऊ द्या, असे म्हणू लागली. दुपारी ३ नंतर हा गोंधळ वाढतच गेला. हे समजताच वांद्रे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लोकांना समजावण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी स्थानिक नेत्याच्या मदतीने गर्दीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. त्यात गर्दीतले काही जण हिंसक झाल्याने पोलिसांनी लाठीमार करत त्यांना घरी पाठवले. यात प्रचंड गोंधळ उडाला. शेकडो बिगारी कामगार मूळ गावी जाण्याची व्यवस्था करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी दुपारी मुंब्य्रात रस्त्यावर उतरले होते.
आदित्य ठाकरेंचा यू टर्न
केंद्राने मजुरांना गावी जाण्याची संधी दिली नाही. राज्याने त्यासाठी एक दिवसाची मुभा मागितली होती. तशी मागणी केल्याचे सांगत आज आदित्य ठाकरे यांनी केंद्राकडे बोट दाखवले. मात्र, यावर २९ मार्चला आदित्य यांनी वेगळेच टिष्ट्वट केल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मजूर व बेघरांनी परत जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी केले आहे, त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला त्यांनी दिले आहेत. ‘स्थलांतर थांबवा, जीव वाचवा’ असे आवाहन आदित्य यांनी आधीच्या टिष्ट्वटमध्ये केले होते. आज केंद्राकडे बोट दाखविणारे आदित्य २९ ला उलट बोलत होते, अशी चर्चा रंगली होती.