मालाडच्या रस्त्यावर हजारो लीटर पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 02:30 AM2017-12-28T02:30:02+5:302017-12-28T02:30:12+5:30
मुंबई : मालाड पूर्वेकडील आप्पापाडा येथील आनंदनगर रिक्षा स्टँडजवळील जलवाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून सतत पाणी गळती सुरू आहे.
मुंबई : मालाड पूर्वेकडील आप्पापाडा येथील आनंदनगर रिक्षा स्टँडजवळील जलवाहिनीतून गेल्या काही दिवसांपासून सतत पाणी गळती सुरू आहे. त्यामुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी होत असून, या ठिकाणी पाणी चोरी होत असल्याचेही निदर्शनास आले आहे.
रस्त्याच्या मध्यभागी खड्डा पडल्याने गळतीतून झिरपणारे पाणी खड्ड्यात जमा होत आहे. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावरून चालताना त्रास सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमध्ये रोजच जमा होणाºया पाण्यामुळे येथील रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य दिसते. त्यामुळे अपघात होण्याची भीतीदेखील स्थानिकांमधून व्यक्त होत आहे. या प्रकरणी स्थानिक नगरसेवक आत्माराम चाचे यांना विचारले असता, रस्त्याच्या दुरुस्तीचे काम लवकरच सुरू होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. ज्या ठिकाणी खड्ड्यात पाणी साचून राहते, तो खड्डा बुजविण्यात येणार आहे. रस्त्याचे काम केल्यावर पाइप लाइन रस्त्याच्या खालून टाकण्यात येतील.
परिसरात पाण्याची चोरी होत असल्याची कबुलीही चाचे यांनी दिली आहे. दिवसा बंद असलेली पाणीचोरी रात्री अनधिकृत जलवाहिन्यांच्या माध्यमातून सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.