आयोजकांवर कांदिवलीत गुन्हा दाखल
प्रसिद्धीसाठी कार्यक्रम करत हजारो लोकांचा जीव धोक्यात टाकला !
भाजप आमदारावर आरटीआय कार्यकर्त्याचा आरोप : आयोजकांवर कांदिवलीत गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात कार्यअहवाल प्रकाशनाचे कारण पुढे करत स्वतःला प्रसिद्धी मिळावी यासाठी जवळपास दीड हजार लोकांचा जीव भाजपचे बोरीवली विधानसभा आमदार सुनील राणे यांनी धोक्यात टाकला असा आरोप सामाजिक आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ते संतोष घोलप यांनी केला. याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर कांदिवली पोलिसांनी जवळपास तीन महिन्यानंतर गुरुवारी कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात दखलपात्र गुन्हा नोंद करत चौकशी सुरू केली.
कांदिवली पश्चिमच्या रघुलीला मॉलमध्ये २४ ऑक्टोबर २०२० रोजी संध्याकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत राणेंच्या कार्यअहवाल प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्याचे मोठमोठे बॅनर सर्वत्र लावण्यात आले होते. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांनी गर्दी केली.* होती. त्याच परिसरातून रिक्षाने जात असताना ही बाब मी पाहिली असे घोलप यांचे म्हणणे आहे. त्यानंतर राणेंच्या सोशल मीडिया अकाउंटवर जाऊन त्यांनी माहिती मिळवली ज्यात एसी हॉलमध्ये हजार ते दीड हजार लोकांना दाटीवाटीने बसवण्यात आले होते. तसेच त्याठिकाणी राज्य शासनाकडून लावलेल्या कोरोनाच्या नियमाचे पालनही करण्यात आले नसल्याचे ते म्हणाले. त्यानुसार ट्विटरवर त्यांनी या सर्वांची माहिती मुख्यमंत्री, मुंबई पोलिसांना ट्विट करुन दिली. तसेच २८ ऑक्टोबर, २०२० रोजी बातम्यांची कात्रणे, व्हिडीओ असे सर्व पुरावे घोलप यांनी गोळा करत कांदिवली पोलिसात लेखी तक्रार दाखल केली.*
पोलिसांसह कोणत्याही खात्याची परवानगी या कार्यक्रमाला नव्हती अशीही माहिती त्यांना चौकशी दरम्यान मिळाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी चौकशी करत गुरुवारी म्हणजे २१ जानेवारी, २०२१ रोजी कार्यक्रम आयोजकांवर कांदिवली पोलिसांनी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
- तेव्हा स्थानिक पोलीस कुठे होते ?
हजारो लोकांनी राणेच्या या कार्यक्रमाला हजेरी लावल्याच्या बातम्या वर्तमानपत्रात फोटोसह छापून आल्या होत्या असे घोलप यांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे संचारबंदी असतानाही हजारोंच्या संख्येने लोक जमा झाले तरीही याबाबत स्थानिक पोलीस ठाणे, उपायुक्त यांना काहीच कसे नाही समजले? त्यावेळी पोलीस कुठे होते? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
------------------------