मुंबई - कोकणातील प्रस्तावित नाणार रिफायनरी विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी पुन्हा एकदा मंगळवारी (27 नोव्हेंबर) आझाद मैदानात धरणे आंदोलन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांचा विरोध मान्य करत जबरदस्तीने प्रकल्प लादणार नसल्याची ग्वाही दिली होती. मात्र तरीही काही एनजीओ मार्फत दलाल व गुंडांची मदत घेत प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप रिफायनरी प्रकल्प विरोधी संघर्ष संघटनेने केला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमदार नितेश राणे, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांसह विविध नेते आज व्यासपीठावर हजर झाले आहेत.
संघर्ष संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सांगितले, की उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करण्यासाठीची कागदपत्रे उच्चस्तरीय समितीकडे एप्रिल महिन्यात दिलेली आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारित असलेल्या उच्चस्तरीय समितीने आजपर्यंत फाईलवर काहीही कार्यवाही केलेली नाही. याचाच अर्थ जनतेचा आक्रोशाकडे मुख्यमंत्री पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत. ग्रामस्थांना स्थानिक निसर्गधारीत शाश्वत जीवनशैली आणि उपजीविका हवी आहे. त्यामुळे हा विनाशकारी प्रकल्प तात्काळ रद्द करावा अशी मागणी वालम यांनी केली आहे.