मुंबई : सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच असून, गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेसंबंधित ४ हजार १६९ गुन्हे नोंद झाले आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड (१,११५) आणि ऑनलाइन फसवणुकीच्या (२,२१२) गुन्ह्यांनी हजारोंचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे क्रेडिट, डेबिट कार्ड स्वाइप करताना विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे.
मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात मुंबईत ५ हजार ९१३ गुन्हे नोंद झाले असून त्यापैकी ५ हजार ५७० गुन्ह्यांची उकल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
१९३० वर संपर्क साधा :
ऑनलाइन फसवणूक झाल्यास तत्काळ १९३० या हेल्पलाईनवर कॉल करून सायबर पोलिसांशी संपर्क साधा, जेणेकरून आपले पैसे वाचविण्यास मदत होईल. आतापर्यंत पोलिसांकड़ून अशा प्रकारे अनेक गुन्ह्यात पैसे वाचविण्यात यश आले आहे.
यामध्ये क्रेडिट कार्ड/ ऑनलाइन फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंद आहेत. यामध्ये दोन गुन्ह्यांची उकल करत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. सायबर फसवणुकीचे २२१२ गुन्हे दाखल आहेत, तर क्रेडिट कार्ड / डेबिट कार्ड फ्राॅडचे (१११५) गुन्हे नोंद आहेत.
असे होते काम :
तक्रारदाराने पोलिसांशी संपर्क साधल्यास सायबर पथकाकडून संबंधित खाते तपासले जाते. ती रक्कम कुठल्या बँकेत वळती झाली, याची माहिती घेतली जाते. त्यानुसार ज्या खात्यात पैसे गेले त्या बँकेच्या नोडल अधिकाऱ्याशी संपर्क साधून खात्याची माहिती घेत, खात्यात रक्कम शिल्लक असल्याचे समजताच फ्रीज्ड केली जाते.