हजारो महामुंबईकर ठाण्यात महामॅरेथॉनमध्ये धावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 07:45 AM2023-11-30T07:45:54+5:302023-11-30T07:46:35+5:30
Lokmat Mahamarathon: येत्या ३ डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी महामुंबईतील शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून, रविवारची पहाट महामुंबईकरांच्या मॅरेथॉनने रंगणार आहे.
मुंबई - येत्या ३ डिसेंबर रोजी ठाणे येथे होणाऱ्या लोकमत महामॅरेथॉनसाठी महामुंबईतील शेकडो लोकांनी आपला सहभाग नोंदवला असून, रविवारची पहाट महामुंबईकरांच्या मॅरेथॉनने रंगणार आहे. महामुंबई मॅरेथॉनचे हे दुसरे वर्ष आहे. ठाण्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या हस्ते ‘फ्लॅग ऑफ’ करून महामॅरेथॉनची सुरुवात होणार आहे. अनेक उच्चपदस्थ अधिकारी व विविध क्षेत्रांतील मान्यवर या मॅरेथॉनमध्ये सहभागी होणार आहेत.
यंदाच्या वर्षी होणाऱ्या महामॅरेथॉनच्या निमित्ताने आदल्या दिवशी म्हणजेच २ डिसेंबर रोजी ठाणे येथील रेमंड संकुलामध्ये बीब एक्स्पोचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर महामॅरेथॉनच्या संस्थापक संचालिका रुचिरा दर्डा या धावपटूंना संबोधित करतील. याच दरम्यान मॅरेथॉनचे मेंटॉर्स, आहारतज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थितांना संबोधित करतील.
रॉक बँडचे आकर्षण
- मॅरेथॉन अँथमवर राज वनमाळी ग्रुप डान्स परफॉर्मन्स सादर करणार आहे.
- झुम्बा परफॉर्मन्स सादर करण्यात येणार आहे.
- उपस्थितांचा उत्साह वाढविण्यासाठी रॉक बँडचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
महामॅरेथॉनविषयी सबकुछ
मॅरेथॉन मार्गावरील सोयीसुविधांची माहिती बिब एक्स्पोमध्ये देण्यात येईल. यावेळी महामॅरेथॉनमधील सहभागी धावपटूंना टीशर्ट, गुडी बॅग, विविध कूपन्स देण्यात येतील. सकाळी १० वाजता बीब एक्स्पोला येणाऱ्या धावपटूंचे स्वागत केले जाणार आहे. त्यांच्या मनोरंजनासाठी रॉक बँडचे आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महामॅरेथॉनला सहकार्य करणारे स्पॉन्सर्स हे या मॅरेथॉनबद्दल आपले मनोगत व्यक्त करणार आहेत. शेवटी रिलॅक्स झीलच्या फिटनेस कोच पेसर्सशी संवाद साधणार आहेत. याच प्रदर्शनादरम्यान सहभागी लोकांना बीब प्रदान करण्यात येतील.
महामॅरेथॉन
कधी : रविवार ३ डिसेंबर
सुरूवात : रेमंड हेलिपॅड ग्राउंड
२१ किलोमीटर : ६ : ०० वा.
१० किलोमीटर : ६ : १० वा.
०५ किलोमीटर : ७ : २० वा.
०३ किलोमीटर : ७ : ३० वा.
बिब एक्स्पो
कधी : शनिवार २ डिसेंबर
कुठे : रेमंड ट्रेड शो, पोखरण, ठाणे.
वेळ : सकाळी १० वाजता.