मुंबई : दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकमत न्यूज नेटवर्क प्रदूषणाचा वाहतूक पोलिसांना सर्वाधिक फटका बसत असून अनेकांना बीपी, शुगर, दम्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मुंबईतील ३ हजार वाहतूक पोलिसांपैकी दिवसभर प्रत्यक्ष रस्त्यावर असणारे हजारो पोलिस प्रदूषणामुळे आजाराच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांना श्वसन विकारासह विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वायू तसेच ध्वनिप्रदूषणात भर घालणाऱ्या चालकांविरुद्ध त्यांनी धडक कारवाईचे सत्र सुरू केले आहे.
मुंबईत जवळपास तीन हजार वाहतूक पोलिस कार्यरत आहे. वाहतुकीचे नियोजन करताना त्यांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने त्यांची वेळोवेळी आरोग्य तपासणीही घेण्यात येते. त्यात बहुतांश जणांना श्वसन विकारासंबंधित समस्या दिसून येतात.
गेल्यावर्षी मार्च महिन्यात वाढत्या तापमानाच्या अनुषंगाने वाहतूक विभागातील ज्या अंमलदारांचे वय ५५ वर्षांपेक्षा जास्त आहे, ज्यांना बीपी, शुगर, दमा, इतर दुर्धर आजार तसेच मोठे ऑपरेशन झाले आहे, त्यांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ यावेळेत रस्त्यावरील कर्तव्याकरिता नेमणूक करण्यात येऊ नये, त्याऐवजी तरुण आणि सशक्त अंमलदारांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातही कामाचे वाटप करताना त्यासाठी जोडीने नेमणूक करावी आणि आवश्यकतेनुसार अंमलदारासोबत वॉर्डनची नेमणूक करावी, अशा सूचनाही वाहतूक विभागाने जारी केल्या होत्या.
अवैध सायलेन्सरवर फिरवला रोड रोलर
मुंबईत वाढते वायू आणि ध्वनिप्रदूषण लक्षात घेऊन वाहतूक विभागाचे सहपोलिस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली कर्णकर्कश हॉर्न वाजविणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.
दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल करण्याचे प्रमाण वाढल्याने वायूप्रदूषणांबरोबर ध्वनी प्रदूषणातही भर पडते. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यापूर्वी साडेअकरा हजारांहून अधिक वाहनांवर कारवाई करत सायलेन्सर व कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न जप्त करत त्यावर रोड रोलर फिरविण्यात आला.
...तर उत्पादक आणि विक्रेत्यांवरही कारवाई
वाहतूक विभागामार्फत प्रदूषण रोखण्यासाठीची मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे. त्यामुळे कंपनीकडून पुरवण्यात आलेल्या दुचाकीच्या मूळ सायलेन्सरमध्ये कोणत्याही प्रकारचा अवैध बदल करण्यात येऊ नये, त्याचप्रमाणे कायद्याने विहित केल्याप्रमाणे वेळोवेळी प्रदूषण नियंत्रण तपासणी करून घ्यावी.
त्यातही असे बदल करून देणाऱ्या सायलेन्सर व प्रेशर हॉर्न उत्पादक, वितरक आणि विक्रेते यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतक पोलिसांनी स्पष्ट केले.