मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या सोमवारी जुहू चौपाटीवर वाकोला येथील पाच लहान मुले पाण्यात गेली असता चारजण बुडाली, तर एकाला वाचविण्यात यश आले. परिणामी जुहूसह मुंबईतील गिरगाव, दादर, वर्सोवा, आक्सा, गोराई या सहा प्रमुख बीचची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. जुहू चौपाटीवर ५० ते ६० जीवरक्षक, पोलिसांची सुरक्षा तैनात करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
जुहू चौपाटीवर रोज सुमारे १० ते १५ हजार पर्यटक येतात, तर रविवार आणि सुटीच्या दिवशी २० ते २५ हजार पर्यटक येतात. येथे दृष्टी कंपनीचे सकाळी ९ आणि दुपारी ११ असे २० जीवरक्षक असतात तर अग्निशमन दलाचा कायमस्वरूपी सकाळी १ आणि दुपारी २ असे एकूण ३ जीवरक्षक तैनात असतात. जुहू कोळीवाडा ते रुईया पार्कपर्यंत सुमारे पाच किमीच्या या बीचवर किमान ५० ते ६० जीवरक्षकांची गरज आहे.
पाण्यात जाऊ नका म्हणून पर्यटकांना हटकले की, ते जुमानत नाही. अनेकवेळा पर्यटक अंगावर धावून येतात. त्यामुळे जीवरक्षकांना तसेच पाण्यात जाणाऱ्या पर्यटकांना अटकाव करण्यासाठी पोलिस तैनात करावेत, अशी मागणी जीवरक्षकांनी ‘लोकमत’ शी बोलताना केली आहे. प्रशासानाने लक्ष द्यावे असेही म्हणाले.
प्रेमीयुगुलांचा वावर
जुहू कोळीवाडाच्या बोटी बंदरावर लागण्यासाठी सुमारे अर्धा किमीची जेट्टी अनेक येथे बांधली आहे. मात्र या जेट्टीचा उपयोग प्रेमीयुगुलच करतात. या ठिकाणी बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे किमान पावसाळ्यात या जेट्टीच्या ठिकाणी प्रेमीयुगुलांना अटकाव करण्यासाठी येथे आणि जुहू बीचवर पोलिस तैनात करावेत, अशी मागणी होत आहे.
भरतीचे फलक लावा
दरवर्षी पावसाळ्यात भरती कोणत्या दिवशी आहे, समुद्रात जाऊ नका असे फलक पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापनाकडून मुंबईतील समुद्राच्या ठिकाणी लावले जातात. जुहू येथे मुले बुडण्याच्या घटना घडून ३ ते ४ दिवस झाले तरी अजून येथे फलक लागलेले नाहीत. त्यामुळे येथे फलक लावण्याची मागणी होत आहे.
फिरत्या वाहनांची गरज
पाच किमीच्या या बीचवर जाण्यासाठी १० मार्ग आहेत. त्यामुळे पाण्यात उतरणाऱ्या पर्यटकांवर करडी नजर ठेवण्यासाठी जीवरक्षकांना फिरते वाहन गरजेचे असून, दुर्घटना घडल्यास रुग्णवाहिका येथे तैनात करण्याची जीवरक्षकांची मागणी आहे.