मुंबई : गुंतवणुकीवर जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून मुंबईसह ठाण्यातील एक हजारहून अधिक जणांना गंडवून आॅइल कंपनीचा मालक पसार झाला. यात, सहा ते सात कोटींची फसवणूक झाल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे. त्यानुसार, विक्रोळी पार्क साइट पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडुपचे रहिवासी असलेले प्रवीण पारकर (३२) यांच्या तक्रारीनंतर हे प्रकरण उजेडात आहे. पारकर हे फिजियो, स्पा थेरपिस्टचे काम करतात. २००५ मध्ये गोरेगाव येथे ज्वेलर्स दुकानात काम करत असताना त्यांची ओळख दर्शन धुत्रे याच्याशी झाली. दर्शनच्या घरी येणे-जाणे असल्याने गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात दर्शनचा भाऊ रेगेश याने आर.आर. एन्टरप्रायझेस या ल्युब्रिकंट आइल कंपनीबाबत माहिती देत, या कंपनीत गुंतवणूक केल्यास व्यवसायिक नफ्यातून ही कंपनी एक लाखावर दीड लाख असा जास्तीचा नफा देते असे सांगितले. पारकरनेही त्यांच्या या आमिषाला बळी पडून कंपनीत गुंतवणूक केली.
ठरल्याप्रमाणे कंपनी मालक राजेश बिरामने याच्यासह भागीदार एकनाथ शिंदे आणि महेश मिश्रा याच्यासोबत भेट घालून दिली. तिघांनीही पारकर याला कंपनीत ठेव ठेवल्यास ठेवीच्या १० टक्के आणि व्याजापोटी ५ टक्के असा एकूण १५ टक्के परतावा दर महिन्याकाठी देण्याचे ठरताच, पारकरने यात बँकेतून ३ लाखांचे कर्ज घेत, स्वत:च्या नावावर २ लाख ८० हजार आणि बहिणीच्या नावावर २० हजार रुपयांची गुंतवणूक या कंपनीत केली. सुरुवातीला परतावा मिळाल्याने, त्याने आणखीन दोन लाख तीस हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर पैसे मिळणे बंद झाले. त्याने गेल्या वर्षी कंपनीच्या कांजूर येथील कार्यालयाकडे धाव घेतली, तेव्हा ते कार्यालय बंद होते. त्यांनी अनेकदा बिरामने आणि संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर, यात फसवणूक झाल्याने त्यांनी पार्क साइट पोलीस ठाण्यात मार्चमध्ये तक्रार दिली. तेव्हा १० तक्रारदार पुढे आले. आतापर्यंत तपासात जवळपास ९०० ते १००० गुंतवणूकदारांना गंडविल्याचा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक गोकूळ बोरसे हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.अटकपूर्व जामिनासाठी धडपडबिरमाने याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गरीब, गरजू, तसेच नोकरदार तरुणांना हेरून त्यांना जास्तीच्या नफ्याचे आमिष दाखवून या कंपनीकडून फसल्या गेलेल्यांचा आकडा जास्तीचा असल्याची शक्यता पोलिसांना आहे.