भविष्य अंधारात... हजारो शाळांत वीज नाही, ऑनलाइन वर्ग कसे घेणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 11:58 PM2020-06-06T23:58:44+5:302020-06-06T23:59:52+5:30
‘ई-स्कूल’समोर अंधार । राज्यात ४० हजारांवर शाळा संगणकांविना
नागपूर : कोरोनाच्या सावटाखाली सध्या आॅनलाइन शिक्षणाचे वारे वाहू लागले आहेत. पण राज्यातील हजारो शाळांत अद्याप वीज पोहोचलेली नसताना आॅनलाईन शिक्षणाचा विचार कसा काय केला जाऊ शकतो, असा सवाल विचारला जात आहे. राज्यातील एक लाख सहा हजार शाळांपैकी तब्बल ६ हजार ६०० शाळांमध्ये विजेची सुविधा नाही. दुसरीकडे वीज बिल भरले नसल्याने १० हजारांवर शाळा अंधारात असल्याची परिस्थिती आहे.
शालेय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या राज्यात १ लाख ६ हजार २३७ इतक्या शाळा आहेत. प्राथमिकच्या तब्बल ६ हजार ६०० हून अधिक शाळांमध्ये वीजच पोहोचली नसल्याची माहिती समोर आली आहे. तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये प्रगत शैक्षणिक धोरण राबविण्यात आल्यानंतरही तब्बल ४२ हजारांहून अधिक शाळांमध्ये संगणकाची सुविधा नाही. माध्यमिकच्या ५ हजार ६०० हून अधिक शाळाही संगणकापासून दूरच राहिलेल्या असल्याची माहिती सरकारच्या एका अहवालात समोर आली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून सुरू करण्यात येत असलेल्या आॅनलाईन शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. यातील बहुतांश शाळा ग्रामीण दुर्गम आणि आदिवासी वस्ती, पाड्यांवर आहेत. तेथे आॅनलाईन शिक्षण कसे पोहोचेल?, असा प्रश्न विविध सामाजिक संघटनांनी उपस्थित केला आहे.
‘संघर्ष वाहिनी’चे संघटक मुकुंद आडेवार म्हणाले की, गावपाड्यावरच्या सहा हजारांहून अधिक शाळांमध्ये अजून वीजच नाही.
इंटरनेट आणि बाकी गोष्टींचा आम्ही विचारही करू शकत नाही. आॅनलाईनसाठी मोबाईल, टीव्ही आणायचा कुठून? असे सवालही त्यांनी केले.
पाड्यांवर किमान पुस्तके वेळेवर द्या
गावपाड्यांपर्यंत इतर वेळेत पुस्तके यायला
कधी दिवाळी उजाडते, त्यामुळे आॅनलाईन शिक्षण आम्हाला दूरच आहे. यावेळी किमान आमच्या मुलांना वेळेत पुस्तके मिळतील का? असा
सवालही आडेवार यांनी केला आहे.
राज्यातील स्थिती
1,06,237
6,600
41,900