मुंबई: गेली अनेक वर्षे सं जय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मागाठाणे विधानसभा मतदार संघातील वनखात्याच्या जमिनीवरील हजारो झोपडट्टीवासीयांना हक्काचे घर मिळणार आहे. या मतदार संघातील केतकीपाडा,धारखाडी दहिसर (पूर्व ),दामूनगर, भीमनगर, गौतमनगर, आंबेडकर नगर,जानूपाडा, पांडे कंपाउंड़, कांदिवली ( पूर्व ) वैभवनगर येथील सुमारे 40 हजार झोपडट्टीवासीय वास्तव्य करत आहे.
आता त्यांना या मतदार संघातील 10 किमी परिसरात सुरू असलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत त्यांना हक्काचे घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. तसेच या संदर्भात विशेष धोरण आखण्याचे ठोस निर्देश देखिल त्यांनी दिले. गेली सुमारे 6 वर्षे येथील शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी सातत्याने प्रयत्न केले होते आणि विधानसभेत आवाज उठवला होता.त्यामुळे येथील हजारो झोपडपट्टीवासीयांना अनेक वर्षांनंतर मोठा दिलासा मिळाला.
विकासकांना या बदल्यात वाढीव चटई क्षेत्र देण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती आमदार सुर्वे यांनी दिली.तसेच या बैठकीत विकास आराखड्यात येणाऱ्या 2011 च्या पात्र झोपड्यांची यादी करून त्यांचे पुनर्वसन करण्याचे आदेश मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली. आज दुपारी एकनाथ शिंदे यांच्या दालनात या संदर्भात महत्वाची बैठक झाली. या बैठकीला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, नगरविकास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, शिवसेना विधीमंडळ मुख्य प्रतोद सुनील प्रभू, आमदार प्रकाश सुर्वे, वन खात्याचे अप्पर सचिव मिलींद म्हैसकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी,पालिका आयुक्त इक्बाल सिह चहल,जिल्हाधिकारी शहर व उपनगर,एसआरएचे मुख्य कार्याकारी अधिकारी, पालिका उपायुक्त विश्वास शंकरवार आदी मान्यवर उपस्थित होते