Join us

'अडीच हजार झाडांच्या बदल्यात २४ हजार झाडे लावली'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 4:56 AM

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचा दावा

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गिकेसाठी आरेमध्ये कारशेडसाठी तोडण्यात येणाऱ्या झाडांच्या विरोधात पर्यावरणवादी संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात येत आहे. यावर कारशेडसाठी बाधित होणाऱ्या २ हजार ६४६ झाडांच्या बदल्यात आत्तापर्यंत विविध भागांत २४ हजार झाडांची लागवड केली असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) सांगण्यात आले.या मेट्रो प्रकल्पात विविध ठिकाणची एकूण ६,२९४ झाडे बाधित होत आहेत. यामध्ये मार्गिकेमध्ये १,५७३ झाडे बाधित होत असून, यातील १,३५५ झाडे तोडण्यात आली आहेत. प्रकल्पामध्ये बाधित झालेल्या झाडांपैकी २,०७५ झाडांचे पुनर्रोपण करण्यात आले आहे. पुनर्रोपण करूनही जी झाडे जगली नाहीत, अशा झाडांच्या बदल्यात नव्याने झाडे लावण्यात आली असल्याचे एमएमआरसीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. एमएमआरसीने आत्तापर्यंत विविध ठिकाणी २३,८४६ झाडे लावली असून, यातील २०,९०० झाडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये लावण्यात आली आहेत, तर मुंबईच्या इतर भागांमध्ये २,९४६ झाडे लावण्यात आली आहेत. मेट्रो-३ मार्गिकेचा प्रकल्प पूर्ण करण्यात आल्यावर प्रकल्पाच्या जागेवर ३ हजार झाडे लावली जाणार असल्याचे एमएमआरसीतर्फे सांगण्यात आले.प्रकल्प सुरू असताना आम्ही या ठिकाणी २५ हजार विविध रोपट्यांचे वाटप केले. तसेच आम्ही लावलेली झाडे ही ६ ते १२ इंच घेराची आणि १२ ते १५ फूट उंचीची असून, यामध्ये सीता, अशोका, कडंब, अर्जुन, मोहागनी, बेहडा, करंज कांचन अशी विविध देशी झाडे आहेत, असे एमएमआरसीतर्फे सांगण्यात आले. मेट्रो-३ मार्गिकेसाठी एमएमआरसीतर्फे आरेमध्ये कारशेड उभारण्यात येणार आहे. पण या कारशेडसाठी तोडण्यात येणाºया झाडांमुळे पर्यावरणावर मोठा परिणाम होणार असल्याने या ठिकाणी कारशेड न उभारता इतर पर्यायी जागांवर हा कारशेड उभारा, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. मात्र आम्हाला आरेशिवाय पर्याय नसून या कारशेडमुळे पर्यावरणाला धक्का लागणार नसल्याचे एमएमआरसीचे म्हणणे आहे.कुठे केले वृक्षारोपण?आरे कॉलनी, मानखुर्द, विद्यानगरी, बीकेसी, पवई, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान.

टॅग्स :मेट्रोआरे