हजारो जलखांब निकामीच

By admin | Published: March 4, 2016 02:13 AM2016-03-04T02:13:20+5:302016-03-04T02:13:20+5:30

मुंबई शहर आणि उपनगरात आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिलासा देणाऱ्या जलखांबांकडे (फायर हायड्रंट) महापालिकेसह अग्निशमन दलाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.

Thousands of water bodies | हजारो जलखांब निकामीच

हजारो जलखांब निकामीच

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये दिलासा देणाऱ्या जलखांबांकडे (फायर हायड्रंट) महापालिकेसह अग्निशमन दलाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे.
महत्त्वाचे म्हणजे अस्तित्वात असलेल्या जलखांबांपैकी कित्येक जलखांब जमिनीखाली गाडले गेले असून, बंद अवस्थेतील जलखांब सुरू करण्याबाबत महापालिका उदासीन आहे. परिणामी काळबादेवी
अथवा गिरगाव चौपाटीसारखी एखादी मोठी आगीची दुर्घटना घडल्यास यातील वित्त आणि मनुष्यहानीला जबाबदार कोण, हा प्रश्न निरुत्तरितच आहे. बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ते शरद यादव यांनी माहिती अधिकारांतर्गत पालिकेकडे फायर हायड्रंटसह आपत्कालीन परिस्थितीत पाण्याचे टँकर्स भरण्याबाबत काय सेवा कार्यान्वित करण्यात आली आहे, याबाबतची विचारणा केली होती. महापालिकेकडून यावर ही माहिती विभागीय साहाय्यक अभियंता जलकामे यांच्याशी निगडित असल्याचे उत्तर देण्यात आले. शिवाय त्याविषयी परस्पर माहिती देण्यासाठी संबंधितांना कळविण्यात येत असल्याचे उत्तरही पालिकेकडून देण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहरात आत्पकालीन परिस्थितीत जलखांबाव्यतिरिक्त पाण्याच्या टँकर्सचीदेखील व्यवस्था करण्यात येते. यासाठी महापालिकेने विविध अठरा ठिकाणी टँकर्स भरण्याची व्यवस्था केली आहे, असेही महापालिकेकडून माहिती अधिकाऱ्याला आवर्जून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
आगीच्या दुर्घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठिकठिकाणी बसविण्यात आलेले फायर हायड्रंट अग्निशमन दलाचे मदतनीस म्हणून काम करतात. महत्त्वाचे म्हणजे मुंबईत दाटीवाटीने वसलेल्या इमारतींच्या परिसरात आग लागल्यास ती विझवण्यासाठी अग्निशमन यंत्रणा फायर हायड्रंटची मदत घेते.
आग भडकल्यानंतर आग विझवणाऱ्या गाडीचा पाइप या हायड्रंटला जोडल्यास आग विझवण्यासाठी आवश्यक पाण्याचा मारा करणे शक्य होते. मात्र आजघडीला या फायर हायड्रंटची दुरवस्था झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे शहरासह उपनगरात ठिकठिकाणी बसविण्यात आलेल्या सुमारे १० हजार ४९७ ब्रिटिशकालीन फायर हायड्रंटपैकी ९ हजार ४०५ फायर हायड्रंट बंद अवस्थेत आहेत.
म्हणजे केवळ ९२ फायर हायड्रंट सुरू असल्याची वस्तुस्थिती आहे. काही फायर हायड्रंट तर जमिनीखाली गाडले गेले आहेत. तर काहींलगत अतिक्रमणे झाली आहेत. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे साफ कानाडोळा केला आहे.इमारतींचे फायर आॅडिट
काळबादेवी येथील आगीत अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पालिका खडबडून जागी झाली. महापालिकेने त्यानंतर सर्व जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आणि फायर आॅडिट करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे रस्त्याच्या दुरुस्तीत गाडले फायर हायड्रंट पुनरुज्जीवित करण्याचे आदेशही महापौरांनी दिले होते. प्रत्यक्षात मात्र झाले काहीच नाही.काळबादेवीच्या आगीनंतर मुंबईतल्या फायर हायड्रंटची दुरुस्ती होणे गरजेचे होते. या आगीला आजघडीला कित्येक महिने लोटले. मात्र अद्याप याबाबत महापालिका प्रशासनाने काही हालचाल केलेली नाही. जसलोक रुग्णालयालगतचा फायर हायड्रंट अर्धाधिक जमिनीत गाडला गेला आहे. असे कित्येक फायर हायड्रंड जमिनीखाली अर्धेधिक गाडले गेले आहेत. परंतु यावर प्रशासन काहीच उपाययोजना करत नाही. गिरगाव चौपाटीच्या आगीनंतर तरी प्रशासनाने धडा घेत यावर कार्यवाही करणे अपेक्षित आहे.
- देवेंद्र आंबेरकर, विरोधी पक्षनेता, मुंबई महापालिकादोन ठिकाणे घाटकोपरमध्ये
आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये टँकर्स भरण्यासाठी महापालिकेकडून करण्यात आलेल्या व्यवस्थेमध्ये अठरा ठिकाणांचा समावेश आहे. परंतु यातील दोन ठिकाणे घाटकोपरमध्येच आहेत. यावर माहिती कार्यकर्त्याने आक्षेप घेतला आहे. या ठिकाणावरून दूरवर कोठे आग लागली आणि संबंधित ठिकाणावरून पाण्याचे टँकर्स आणायचे झाल्यास वाहतूककोंडी अथवा इतर समस्यांमुळे पाण्याचे टँकर्स घटनास्थळी कसे दाखल होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
> आगीसारख्या आपत्कालीन परिस्थितीत टँकर्स भरण्यासाठी महापालिकेकडून केलेली व्यवस्था
मुंबई शहर
वरळी हिल व्हॉल्व कंट्रोल रूम
आझाद मैदान जलाशय व पम्पिंग स्टेशन
भंडारवाडा हिल जलाशय
फॉसबरी सर्व्हिस जलाशय, कॉटनग्रीन
फुटका टँक चौकी, माटुंगा
नाना चौक चौकी
पूर्व उपनगर
घाटकोपर यार्डमध्ये दोन ठिकाणी
पश्चिम उपनगर
वाकोला पाइपलाइन रोड
एच/वेस्ट वॉर्ड कार्यालय
फ्लाय ओव्हर ब्रिजखाली, अंधेरी पूर्व
फ्लाय ओव्हर ब्रिजखाली, अंधेरी पश्चिम
पी/साऊथ वॉर्ड, गोरेगाव पश्चिम
लिबर्टी उद्यान बोगदा येथे दोन ठिकाणी
पोईसर डेपो, कांदिवली पश्चिम
लिंक रोड, बोरीवली पश्चिम
आर/नॉर्थ वॉर्ड कार्यालय, दहिसर पश्चिम

Web Title: Thousands of water bodies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.