‘तिहेरी तलाक’विरोधात हजारो महिलांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 12:47 AM2018-04-01T00:47:36+5:302018-04-01T00:47:36+5:30
तिहेरी तलाक विधेयक हे मुस्लीम समाजाच्या विरोधात असल्याचे सांगत शनिवारी आझाद मैदानावर हजारो मुस्लीम महिलांनी आंदोलन केले. शरिया कायद्यात सरकारकडून होणारी ढवळाढवळ थांबवावी, तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, मुस्लीम महिलांना त्यांचे हक्क द्यावेत अशा मागण्या या वेळी महिलांनी मांडल्या. या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
मुंबई : तिहेरी तलाक विधेयक हे मुस्लीम समाजाच्या विरोधात असल्याचे सांगत शनिवारी आझाद मैदानावर हजारो मुस्लीम महिलांनी आंदोलन केले. शरिया कायद्यात सरकारकडून होणारी ढवळाढवळ थांबवावी, तीन तलाक विधेयक मागे घ्यावे, मुस्लीम महिलांना त्यांचे हक्क द्यावेत अशा मागण्या या वेळी महिलांनी मांडल्या. या मागण्यांचे निवेदन राज्यपालांना देण्यात येणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
पर्सनल लॉ बोर्डाच्या वतीने आयोजित आंदोलनात मुस्लीम समाजातील सर्व पंथ, संघटना, राजकीय नेते मोठ्या संख्येने सामील झाले होते. आंदोलक महिलांनी सांगितले की, ‘आम्ही तीन तलाक विधेयकाच्या विरोधात आहोत. या विधेयकाने मुस्लीम महिलांचे संरक्षण होणार नाही. याउलट मुस्लीम महिला त्यांच्या हक्कांपासून वंचित राहतील. तिहेरी तलाक हा इस्लामचा एक भाग आहे. त्यामुळे सरकारने त्यामध्ये ढवळाढवळ करू नये.
आॅल इंडिया मुस्लीम लॉ बोर्डाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा आसमा झेहरा म्हणाल्या की, सरकार जगासमोर मुस्लीम महिलांना लाचार आणि मुस्लीम पुरुषांची प्रतिमा चुकीची दाखविण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वच मुस्लीम पुरुष तिहेरी तलाक देतात, चार-चार निकाह करतात, असे चित्र दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारने शरिया कायद्याचा अभ्यास न करताच लोकसभेत विधेयक मंजूर करून घेतले आहे. तिहेरी तलाक हा सरकारचा बहाणा असून, त्याच्या नावाखाली सरकार शरिया कायद्यावर निशाणा साधत आहे.
महिला राज : संपूर्ण आंदोलनात केवळ महिलाच सहभागी झाल्या होत्या. १५०० पुरुष कार्यकर्त्यांव्यतिरिक्त संपूर्ण आझाद मैदानात महिलाच होत्या. व्यासपीठावरही महिलाच उपस्थित होत्या. आंदोलकांना संबोधित करण्यासाठी महिला वक्त्या पुढे आल्या. विशेष म्हणजे सुरक्षेसाठी मोठ्या संख्येने महिला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.
नेत्यांना आमंत्रण नाही : कोणत्याही राजकीय पक्षाने, नेत्याने आंदोलनाचे श्रेय लाटू नये यासाठी कोणत्याही नेत्याला आंदोलनासाठी आमंत्रण दिले नव्हते. तसेच कोणालाही व्यासपीठावर
जाण्याची परवानगी दिली नाही. परंतु समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आझाद मैदानावर हजेरी लावत आंदोलनाला पाठिंबा दिला.
वाहतूककोंडी : हजारो महिलांनी शनिवारी दुपारी २ वाजल्यापासून आझाद मैदानाकडे धाव घेतली. मुंबईच्या विविध भागांमधून बसने या महिला आझाद मैदानात पोहोचल्या. त्यामुळे दुपारी २ ते ३च्या दरम्यान आझाद मैदान परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. तसेच बहुतांश महिला रेल्वेने आल्या होत्या.
शरिया हा देवाने तयार केलेला कायदा आहे. आपण तो बदलू शकत नाही. कुराणने महिलांचा आदर केला आहे. त्यांच्या कल्याणाकडे कुराणमध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यामुळे सर्वांनीच त्याचा आदर करायला हवा. सरकारने तिहेरी तलाक विधेयक मागे घ्यावे.
- सुमय्या पटेल, मुंबई सेंट्रल
तिहेरी तलाक विधेयक मुस्लीम समाजासाठी नुकसानकारक ठरेल. त्यामुळे मी या तिहेरी तलाकविरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथे आले आहे.
- आजरा अन्सारी, रे रोड
आम्हाला आमच्या मुस्लीम लॉ बोर्डाचे नियम आणि कायदे आचरण्याची मुभा द्यावी. सरकारने त्यात ढवळाढवळ करू नये. सरकारने अशी विधेयके मंजूर करण्यापेक्षा मुस्लीम महिलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायला हव्यात.
- तबस्सुम रिझवी, नागपाडा
शरिया कायद्यामध्ये महिलांच्या हिताचेच नियम आहेत. तत्काळ तिहेरी तलाकचा शरिया कायद्यात कोठेही उल्लेख नाही. शरिया कायदा मुस्लिमांचे कल्याण करण्यासाठी समर्थ आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत
काही ठिकाणी चुकीच्या घटना घडतात. केवळ शिक्षण हाच त्यावरील उपाय आहे.
- सुफिया शेख, मुंबई सेंट्रल