Join us

थरांचा झेंडा फडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:59 AM

देशभर मुंबई आणि ठाण्याची ओळख असलेला दहीहंडी उत्सव यंदाही अत्यंत जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला.

मुंबई / ठाणे : देशभर मुंबई आणि ठाण्याची ओळख असलेला दहीहंडी उत्सव यंदाही अत्यंत जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला. ठाण्यात मनसेच्या दहीहंडी उत्सवात बोरीवलीच्या शिवसाई गोविंदा पथकाने नऊ थर लावून तब्बल ११ लाखांचे बक्षीस पटकावले. याच ठिकाणी जोगेश्वरीच्या जय जवाननेदेखील नऊ थरांची सलामी दिली. विशेष म्हणजे नव्या विक्रमाची नोंद करण्यासाठी ठाण्यात दहा थर लावण्याचेही दोन प्रयत्न झाले, तथापि ते निष्फळ ठरले. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दोन्ही गोविंदा पथकांना ११ लाखांचे पारितोषिक विभागून देण्यात आले.न्यायालयाच्या कचाट्यातून सुटलेला दहीहंडी उत्सव मंगळवारी मुंबई शहर-उपनगरांसह ठाण्यात जोशपूर्ण वातावरणात साजरा झाला. तथापि, बड्या आयोजकांनी माघार घेतल्याने शहर-उपनगरांतील गर्दी ओसरलेली दिसून आली. शिवाय, डीजे आणि साउंड सिस्टीमवाल्यांनीही बंद पुकारल्याने म्युझिकचा दणदणाटही ‘म्यूट’वर गेला होता.ठाण्यातील भगवती शाळेच्या पटांगणावर मनसेने दहीहंडी उत्सव आयोजित केला होता. यात १५०हून अधिक पथकांनी सहभाग घेतला. दहा थर लावण्यासाठी सकाळी जय जवान पथक मैदानात उतरले. मात्र त्यांना अपयश आले. दुपारी नऊ थर लावण्यासाठी शिवसाई गोविंदा पथक आले आणि एकच शांतता पसरली. एकावर एक थर रचताना सर्वांनी श्वास रोखून धरला होता, बघ्यांचीही तुडुंब गर्दी झाली. एकेक थर वर जात असताना आयोजकांसह सर्वांच्याच मनात धाकधूक होती. अखेर दुपारी ३.१५ वाजता शिवसाई गोविंदा पथकाचे पहिल्याच प्रयत्नात नऊ थर लागले आणि जमलेल्या उत्सवप्रेमींनी एकच जल्लोष व टाळ्यांचा कडकडाट केला. संध्याकाळी मनसेच्या दहीहंडीपाशी पुन्हा आगमन केलेल्या जय जवान गोविंदा पथकाने तिसºया प्रयत्नात नऊ थरांची सलामी दिली. गेल्या वर्षी याच ठिकाणी जय जवान गोविंदा पथकाने पहिल्याच प्रयत्नात नऊ थरांची सलामी दिली होती.मुंबईतही दहीहंडीवरील निर्बंध उठवल्यानंतर सर्वत्र गोविंदांचा उत्साह दिसून आला. आयोजकांकडूनही हंडी फोडणाºया गोविंदांसाठी सेफ्टी गिअर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात आली होती. दादरमध्ये आयडियल येथे आयोजन करण्यात आलेली हंडी मराठी कलाकारांनी फोडली. शिवाय, दादर येथील नक्षत्र मॉलनजीक हंडीसमोर विक्रोळी येथील महिला पथकाने सहा थर रचून सलामी दिली.भायखळा, लालबाग, परळ, लोअर परळ, वरळी, माहीम आणि घाटकोपरसह उर्वरित ठिकाणी गोपिकांचा उत्साह उल्लेखनीय होता. गोविंदांच्या खाद्यांला खांदा लावत गोपिकांनीही ‘हम भी किसीसे कम नही...’ असे म्हणत थरावर थर रचले आणि मुंबापुरीतल्या हंडीच्या उत्साहात रंग भरला.सकाळपासून पावसाच्या सरींच्या आगमनाने रंगलेला हा सोहळा सायंकाळपर्यंत उत्तरोत्तर रंगल्याचे चित्र होते. पाऊस पडला तर दहिहंडी फोडताना अधिक मजा येईल, अशी चर्चा गोविंदा पथकांमध्ये सुरू होती. दुपारपर्यंत अधूनमधून हलक्या सरी पडल्या आणि त्यांची ही इच्छा काही प्रमाणात तरी पूर्ण झाली.