मुंबई, दि. 23 - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याविरोधात केलेल्या तक्रारी मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आला, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. शुक्रवारी (22 सप्टेंबर) रात्री हा फोन आल्याचे अंजली यांनी सांगितले. दरम्यान, हा फोन पाकिस्तानातून आला असून ट्रु कॉलरवर हा क्रमांक 'दाऊद 2' असा डिस्प्ले होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तक्रार मागे घेतली नाहीस तर तुझे जगणे हराम करेन, अशी धमकी अंजली यांना देण्यात आली. याप्रकरणी त्यांनी वाकोला पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पोलीस अधिक चौकशी करत आहेत.
माजी मंत्री खडसेंची ‘एसीबी’कडून चौकशी, एकनाथ खडसेंकडून इन्कार
दरम्यान, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदीप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नव्याने केलेल्या आरोपांची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सुरू केली आहे. खडसे यांनी बुधवारी दुपारी येथील एसीबी कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन तास खडसे यांची चौकशी करण्यात आली असली तरी, अधिका-यांनी त्याबाबत काहीही माहिती दिली नाही. चौकशी आटोपून परतणा-या खडसोंना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. ‘छापा, छापा मोठा फोटो छापा’ असे पत्रकारांना उद्देशून आपली उद्विनता व्यक्त केल्याने एसीबीने चौकशीत बरेच प्रश्न खडसेंना विचारले असावेत, असा अर्थ काढला जात आहे. नाशिक अॅन्टी करप्शन ब्युरो कार्यालयात चौकशीसाठी गेल्याचा खडसे यांनी इन्कार केला आहे. कार्यालयात आपण गेलो होतो. मात्र आपली कोणतीही चौकशी येथे नव्हती तर कागदपत्रे घेण्यासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले.
माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचे भोसरी येथील एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरण सध्या गाजत असून, प्रारंभी या जमिनी खरेदीची आपणास काहीच माहिती नसल्याचे सांगणा-या खडसे यांनी चौकशी आयोगासमोर त्याची कबुली दिली. परंतु जमीन व्यवहाराचे पैसे आपण दिले नसल्याचा पवित्रा घेतला होता. त्यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अलीकडेच प्रसिद्धीमाध्यमांसमोर खडसेंच्या बॅँक व्यवहारांची माहिती जाहीर करून याबाबत न्यायालयातही तक्रार केली होती. न्यायालयाने खडसेंविरुद्ध चौकशी करणा-या लाचलुचपत प्रतिबंधक विभागावर ताशेरेही ओढले होते.
या सर्व पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी दोन वाजता खडसे यांनी पोलीस बंदोबस्तात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कार्यालयात हजेरी लावली. सुमारे दोन ते अडीच तास खडसे या कार्यालयात हजर होते. यावेळी मात्र पत्रकार तसेच अभ्यागतांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात आला. चार वाजेनंतर खडसे चौकशी आटोपून निघून गेले. परंतु त्यांची नेमकी कोणत्या विषयावर चौकशी करण्यात आली याचा उलगडा होऊ शकला नाही.
लाचलुचपतचे सोयीस्कर मौनएरव्ही दोनशे रुपये लाच घेणा-याला पकडल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांना प्रेस नोट पाठवून आपली पाठ थोपटून घेण्यात धन्यता मानणाºया लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्याबाबत मात्र सोयीस्कर मौन पाळले. प्रसिद्धीमाध्यमांनी विचारणा केल्यावर ‘नो कॉमेंट्स’ एवढेच उत्तर देण्यात आले. त्यामुळे लाचलुचपत खाते कोणाच्या तरी दबावाखाली काम करीत असल्याची चर्चा होऊ लागली आहे.
खडसेंची उद्विग्नताएकनाथ खडसे दुपारी २ वाजता पोलिसांच्या ताफ्यातच एसीबीच्या कार्यालयात हजर झाले. खडसे स्वत:हून हजर झाल्याचे वृत्त पसरताच, त्यांच्या समर्थकांनीही कार्यालयाच्या बाहेर गर्दी केली होती. चौकशी आटोपून खडसे निघाल्यावर प्रसिद्धिमाध्यमांनी त्यांना माहिती विचारण्याचा प्रयत्न केला तर काहींनी त्यांची छबी टिपली. त्यावर त्रासून खडसे यांनी प्रसिद्धिमाध्यमांवरच राग काढत ‘छापा, छापा, माझा मोठा फोटो छापा’ असे सांगून त्यांनी त्रागा केला.