वाद मिटविण्यासाठी तडीपार करण्याची धमकी
By admin | Published: February 6, 2017 03:35 AM2017-02-06T03:35:23+5:302017-02-06T03:35:23+5:30
आर्थिक व्यवहारावरून एका व्यावसायिकाविरोधात न्यायालयात असलेला वाद न्यायालयाबाहेर मिटवावा यासाठी आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणाऱ्या कुलाबा पोलीस
मुंबई : आर्थिक व्यवहारावरून एका व्यावसायिकाविरोधात न्यायालयात असलेला वाद न्यायालयाबाहेर मिटवावा यासाठी आपल्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणाऱ्या कुलाबा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी एका व्यावसायिकाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कुलाबा येथील गोकूळ हॉटेलचे मालक दिनेश पुजारी यांचे बंधू हरिश आणि अन्य एक हॉटेल व्यावसायिक रवी बैद यांच्यात आर्थिक व्यवहारावरून वाद असून, त्यासंदर्भात रायपूरच्या न्यायालयात खटला चालू आहे. कुलाबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय धोपावकर यांनी गेल्या आॅगस्ट, सप्टेंबर व आॅक्टोबरमध्ये, असे तीन वेळा आपल्या कार्यालयात बोलावून हा वाद मिटविण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला. वेगवेगळ्या पद्धतीने धमकावूनही त्यात मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर २७ नोव्हेंबरला पोलिसांनी आपल्या अटकेचे कुभांड रचल्याचा आरोप दिनेश पुजारी यांनी केला आहे.
त्या दिवशी सध्या वेषातील एका पोलीस अंमलदाराने मागितलेले शीतपेय दिले नसल्याच्या कारणावरून हॉटेलच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर मलाच बोलावून पोलिसांना मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला. एका दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर मी जामिनावर सुटलो. त्यानंतर १ नोव्हेंबरला चौकशीच्या निमित्ताने पोलिसांनी आपल्याला पोलीस ठाण्यात बोलावून वाद न मिटविल्यास दोघा भावांविरुद्ध तडीपारीची कारवाई केली जाईल, अशी पुन्हा धमकी दिली.
घडलेल्या घटनेचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांकडे सादर केल्यानंतरही ज्या डीव्हीएलआरमधील हे फूटेज आहे, ते डीव्हीएलआरच काढून पोलिसांच्या स्वाधीन करावे असा आग्रह पोलीस धरत आहेत. हॉटेलच्या सुरक्षायंत्रणेचा भाग म्हणून हे डीव्हीएलआर कायमस्वरूपी बसविण्यात आले आहे. त्यातील फूटेज पंचनामा करून काढून घ्यावे, अशी विनंती पोलिसांना केली. पण पोलीस त्यासाठी तयार नाहीत, असे निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणात पोलीस अंमलदार हॉटेलमध्ये का गेला, असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा तो अंमलदार फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी गेला होता, असे स्पष्टीकरण देण्यात आले. मात्र माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत पोलिसांनी या रस्त्यावर (१0 तुलच मार्ग) गेल्या सहा महिन्यांत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईच झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पोलीस खोटे बोलत असल्याचे सिद्ध होते. त्याचवेळी पोलिसांनी, प्रकरण तपासाधीन असल्याच्या कारणाखाली काही माहिती नाकारली आहे. याउलट फिर्यादीवर दबाव आणण्यासाठी आरोपी माहिती अधिकारात माहिती मागत असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिका पाहता वरिष्ठ निरीक्षक धोपावकर तसेच या प्रकरणातील फिर्यादी पोलीस अंमलदार संतोष कोळी यांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी दिनेश पुजारी यांनी पोलीस आयुक्तांकडे केली. पण, कारवाई न झाल्याने त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली आहे. (प्रतिनिधी)