कोरोनाचा धोका पूर्णतः टळला नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:06 AM2021-05-24T04:06:12+5:302021-05-24T04:06:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : रुग्ण संख्या नियंत्रणात येत असली तरी कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. संभाव्य तिसरी ...

The threat of corona was not completely averted | कोरोनाचा धोका पूर्णतः टळला नाही

कोरोनाचा धोका पूर्णतः टळला नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : रुग्ण संख्या नियंत्रणात येत असली तरी कोरोनाविरुद्धची लढाई अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. संभाव्य तिसरी लाट आणि त्याचे लहान मुलांवरील परिणामांबाबत सध्या अंदाजच आहेत. पण, आपण सावध राहिले पाहिजे. यापूर्वी कोरोनाचा कहर वाढत असताना कडक निर्बंध लावण्यासारखे कटू निर्णय घ्यावे लागल्याचे सांगतानाच अद्याप कोरोनाचा धोका पूर्णतः टळला नसल्याचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी दिला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझा डाॅक्टर’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात रविवारी राज्याच्या कोविडविषयक बाल रोग तज्ज्ञांच्या टास्कफोर्सने राज्यभरातील ६ हजार ३०० बाल रोग तज्ज्ञांना उपचार पद्धतीसंदर्भात ऑनलाइन मार्गदर्शन केले. बालरोग तज्ज्ञांसह इतर संस्था, संघटनेतील सुमारे ५२ हजार डॉक्टर्स आणि नागरी सर्वसामान्य दर्शकांनी विविध माध्यमातून हा कार्यक्रम पाहिला. सर्व डाॅक्टर, आरोग्य यंत्रणा, सरकारला सहकार्य करणारे विविध पक्षांचे लोक आणि नागरिकांमुळे रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्यात आपल्याला यश येत असल्याचे सांगतानाच मी केवळ निमित्तमात्र आहे. माझी टीम मजबूत व कुशल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

तिसऱ्या लाटेसाठी आपण सावध राहिले पाहिजे. या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. लहान मुलांच्या बाबतीत आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनीदेखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे योग्य मार्गदर्शन करावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा व इतर काही बाबींचा तुटवडा जाणवला; पण आपण आता ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यासाठी ठोस पावले टाकली आहेत. १८ ते ४४ वयोगटातील वर्गासाठी १२ कोटी लसी एक रकमी घेण्याची आमची तयारी आहे पण लसी उपलब्ध नाहीत हीच अडचण आहे. जूननंतर लस पुरवठा सुरळीत सुरू होईल आणि आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांचे लसीकरण वेगाने सुरू करू शकू, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

चौकट १

बाल रोग तज्ज्ञांचेही टास्कफोर्स

राज्य शासनाच्या बाल रोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्सचे अध्यक्षपद डॉ. सुहास प्रभू यांच्याकडे असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत. या तज्ज्ञांनी लहान मुलांमधील कोविड संसर्ग आणि वैद्यकीय उपचाराबाबत विस्तृत माहिती दिली. यावेळी मुख्य टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. तात्याराव लहाने यांनीदेखील यावेळी सूचना केल्या.

चौकट २

उपचारांबाबत अनेक शंकांचे समाधान

सुरुवातीला टास्क फोर्सने सादरीकरण केले. कोविडग्रस्त मुलांना स्तनपान, अंगणवाडी सेविकांची भूमिका, यावेळी त्यांनी मुलांमध्ये सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग कसा ओळखावा, सीटी स्कॅन सरसकट मुलांमध्ये करू नये, मुलांमध्ये सहव्याधी फारशा नसतात; पण ज्यांच्यात आहेत त्यांच्यावर कसे उपचार करावेत, घरातील ज्येष्ठ सदस्यांना कोविडग्रस्त मुलांपासून कसे दूर ठेवावे, कोविडमुळे मुलांमधील फुप्फुसाचा संसर्ग, मधुमेही टाईप एक मुलांच्या बाबतीत उपचार, मुलांसाठी ६ मिनिटे वॉक टेस्ट कशी करावी, घरी विलगीकरणातील मुलांच्या उपचाराचा प्रोटोकॉल कसा असावा, अशा मुलांना कोविड काळजी केंद्रात घेऊन जाण्याची नेमकी परिस्थिती कशी ओळखायची, कोविडमधील मुलांना खाण्यापिण्याची काय पथ्ये असावीत, अशा मुलांना बीसीजी व इतर लसींच्या बाबतीत काय करावे, मुलांमध्ये म्युकरमायकोसिसची किती शक्यता असते, मुलांमध्ये हायपोक्सिया होतो का, मुलांना नेमकी कोणती लस द्यावी, लहान मुलांना मास्क घालावा किंवा नाही याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.

Web Title: The threat of corona was not completely averted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.