Join us

राज्यात कोरोनासह डेंग्यूचा धोका; नागपूरमध्ये अधिक प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाची तिसरी लाट येणार, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात असताना आता नागपूरमध्ये डेंग्यूने थैमान ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाची तिसरी लाट येणार, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात असताना आता नागपूरमध्ये डेंग्यूने थैमान घातले आहे. गेल्या दीड महिन्यांत डेंग्यूमुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वैद्यकीय तज्ज्ञांनी अधिक खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत सततच्या पावसामुळे मलेरिया आणि डेंग्यूचा धोका वाढल्याचे दिसून आले आहे. गेले दीड वर्ष कोरोनाच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जून महिन्यात मलेरियाचे ३५७ रुग्ण आढळून आले होते, तर जुलैच्या दहा दिवसांत २३० रुग्णांची नोंद झाली होती. वर्षभरात मलेरियाच्या दोन हजार रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचवेळी डेंग्यूचे २० रुग्ण आढळून आले आहे. यापैकी, बहुतांशी रुग्ण कुलाबा, कफपरेड, माझगाव, चर्चगेट, वरळी, लोअरपरळ या विभागांमध्ये आढळले आहेत.

तापाचे निदान झाल्यानंतर घाबरून न जाता तत्काळ औषधोपचार सुरू करावेत. शारीरिक अवस्थेनुसार आवश्यकता भासल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल केले जाते. औषधोपचार सुरू असतानाच रुग्णाचे जेवण आणि पाण्याच्या सेवनाकडे नातेवाइकांनी लक्ष देणे आवश्यक आहे. मलेरियामध्ये रक्तातील साखर कमी होते. तेव्हा मधुमेहाच्या रुग्णांच्याबाबत ही काळजी घेणे गरजेचे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टरांनी दिलेल्या औषधांचा डोस पूर्ण करणे. बहुतांश वेळा रुग्ण ताप किंवा अन्य त्रासाने बरे झाले की औषधे घेणे बंद करतात. तसे करू नये, असे फिजिशिअन डॉ. रचना गांधी यांनी सांगितले.

वैद्यकीय निदान महत्त्वाचे

ऋतुबदलामुळे ताप आला तर ताप कोरोनाचा आहे, असा समज करून डॉक्टरांकडे न जाण्याचा मार्ग काही नागरिक अवलंबितात; मात्र असे वागणे चुकीचे आहे. ताप कोणत्या प्रकारचा आहे, याचे वैद्यकीय निदान योग्यवेळी होणे गरजेचे आहे. दुसरी लाट ओसरल्यामुळे अनेक मुंबईकर निर्धास्तही झाले आहेत. पावसाळी आजार प्रत्येकवर्षी डोके वर काढतात. त्यामुळे योग्य प्रकारची काळजी घेतली, तर या आजारांनाही दूर ठेवता येईल.

- डॉ. कुरुश सोमण, संसर्गजन्य आजार तज्ज्ञ.