- सचिन लुंगसेमुंबई : जागतिक तापमानवाढीचा धोका दिवसागणिक वाढत असून, आता तर २०१५ सालच्या पॅरिस करारानुसार पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी जगाचे तापमान ३.२ अंश सेल्सिअसने वाढण्याच्या मार्गावर आहे. याचा अर्थ म्हणजे जागतिक तापमानवाढीचे आणखी दुष्परिणाम होणार असून, हा धोका वाढतच आहे. महत्त्वाचे म्हणजे तापमानवाढ १.५ पर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी किंवा कमी करण्यास सर्व देशांनी प्रयत्न करणे गरजेचे असून, या तापमानवाढीचा फटका विकसनशील देशांना बसत आहे.संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाने वार्षिक कार्बन अहवालातून हा इशारा दिला असून, जागतिक तापमानवाढ ही १.५ अंश सेल्सिअसच्या मर्यादेपर्यंत निश्चित ठेवण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. हे लक्ष्य गाठायचे असेल तर पुढील एका दशकात कार्बन उत्सर्जन हे दरवर्षी ७.६ टक्क्यांनी घटले पाहिजे. जागतिक तापमानात १.५ अंशांनी वाढ झाली तर जागतिक तापमानवाढीचे आणखी चटके बसतील. चक्रीवादळे, उष्णतेमध्ये होणारी वाढ हे जागतिक तापमानवाढीचे परिणाम आहेत, हे यापूर्वीच इंटरगव्हर्नमेंटल पॅनल आॅन क्लायमेट चेंज (आयपीसीसी) ने विविध अहवालांद्वारे निदर्शनास आणून दिले आहे. २०२० पर्यंत कार्बन उत्सर्जन कमी करणे कमप्राप्त असून, उत्सर्जन कमी करण्यासाठी वेगाने कारवाई करणे अपेक्षित आहे. जर आपण काहीच पावले उचलली नाहीत तर आपण बरेच काही गमवू शकू, असे संयुक्त राष्ट्राच्या इशाऱ्यात नमूद करण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे विकसित देशांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे महत्त्वाचे आहे. विशेष बाब म्हणजे जगभरात होत असलेल्या कार्बन उत्सर्जनापैकी ७८ टक्के कार्बन उत्सर्जनास विकसित देश जबाबदार आहेत.तापमानवाढीमुळे काय होईल?- हरितगृह वायू असेच उत्सर्जित होत राहिले, तर देशातील सरासरी तापमानात ४ अंश सेल्सिअसची वाढ होईल. परिणामी, उष्णतेमध्ये वाढ झाल्याने २१०० सालापर्यंत देशभरात दरवर्षी जवळजवळ १५ लाख लोकांचा मृत्यू होईल.- अतिवृष्टीचा धोका वाढणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील ६४ टक्के मृत्यू वाढत्या तापमानामुळे होतील.- टाटा सेंटर फॉर डेव्हलपमेंटद्वारे युनिव्हर्सिटी आॅफ शिकागोत करण्यात आलेल्या संशोधनानंतर ही बाब समोर आली आहे.- जागतिक तापमानवाढीमुळे काही दशकांनी ३५ अंशांपेक्षा अधिक तापमान नोंदविण्यात येत असलेल्या उष्ण दिवसांचा सरासरी आकडा आठ पटीने वाढेल आणि हे प्रमाण ४२.८ टक्के एवढे होईल.- २१०० सालापर्यंत देशातील १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील सरासरी तापमान ३२ अंशांपेक्षा अधिक असेल.परिणाम काय झाले?- जागतिक तापमानवाढीमुळे झाल्या अतिवृष्टीच्या नोंदी.- हवामान शास्त्रज्ञांचा अंदाज; मान्सूनच्या हंगामात मुंबईत पाच वेळा झाली अतिवृष्टी.- मुंबईत ६२.४ टक्के अतिरिक्त पाऊस पडला.- १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान जवळपास १० वेळेस तीन अंकी पावसाची नोंद झाली.- २ जुलै रोजी मुंबईत ३७५.२ मिमी एवढ्या जोरदार पावसाची नोंद झाली.- मान्सूनच्या २०१९ सालच्या नोंदीनुसार, मुंबईत पाच वेळा अतिवृष्टीची नोंद झाली.आपत्कालीन घटना अन् मनुष्यहानीभारतीय उपखंडातील भौगोलिक परिस्थितीत झालेले बदल, जागतिक तापमानवाढ हे घटक अतिवृष्टीस कारणीभूत ठरत आहेत.गृहमंत्रालयाच्या आकड्यानुसार, या वर्षी २२ राज्यांतील ३५७ जिल्ह्यांतील २५ लाख नागरिक पूर, पाऊस आणि जमीन खचणे यांसारख्या आपत्कालीन घटनांनी प्रभावित झाले.आपत्कालीन घटनांत १ हजार ८७४ नागरिकांचा मृत्यू झाला असून, ३ लाखांहून अधिक घरांचे नुकसान झाले; तर १४.१४ लाख हेक्टरवरील शेतीची हानी झाली.
ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढतोय; जागतिक तापमानवाढीचा वेग पोहोचला ३.२ अंशांवर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 1:01 AM