मुंबई : खंडणीसाठी हॉटेल मालकाला जीवे ठार मारण्याची धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार पवईमध्ये सोमवारी उघडकीस आला. याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १० ने आरोपींना सोमवारी अटक केली आहे. सचिन उर्फ बाबू शंकर मोहिते (३७) असे आरोपीचे नाव आहे. २५ मेला पवईतील एका हॉटेलच्या मालकाला मोहिते याने शिवीगाळ करत २५ हजारांची मागणी केली. पैसे न दिल्यास त्याच्या जीवाचे बरेवाईट करण्याचीही धमकी दिली. त्याने याबाबत पवई पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पवई पोलिसांसह कक्ष १० चे प्रमुख अनिल माने आणि त्यांचे पथक मोहितेला पोलीस शोधत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो अज्ञात स्थळी लपून बसला होता. मरोळ परीसरातून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या.
हॉटेल मालकाला खंडणीसाठी मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 5:46 AM