Join us

कोरोनानंतरही ‘लाँग कोविड’चा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘लाँग कोविड’ या शब्दाची कोणतीही व्याख्या पुस्तकात लिहिलेली नाही; पण ज्या रुग्णांच्या बाबतीत पोस्ट-कोविड ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : ‘लाँग कोविड’ या शब्दाची कोणतीही व्याख्या पुस्तकात लिहिलेली नाही; पण ज्या रुग्णांच्या बाबतीत पोस्ट-कोविड म्हणजे काेराेना होऊन गेल्यानंतरची लक्षणे सहा महिन्यांहून अधिक काळापर्यंत दिसतात, अशा रुग्णांना लाँग कोविडचा सामना करावा लागत असल्याचे मानले जाते.

‘लाँग कोविड’च्या लक्षणांमध्ये थकवा, थोड्याशा श्रमांमुळेही धाप लागणे, सततचा कफ, स्नायू व सांधेदुखी, श्रवणक्षमता व नजर कमी होणे किंवा त्यात दोष निर्माण होणे, प्रदीर्घ काळ गंध किंवा चव न जाणवणे या गोष्टींचा समावेश होतो. ‘लाँग कोविड’च्या अनेक रुग्णांना चिंता आणि नैराश्य यासारख्या मानसिक आरोग्याच्या समस्याही जडल्याचे निदर्शनास आले आहे, अशी माहिती डॉ. फरहान इंगळे यांनी दिली. कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास हाती घेतला जात आहे. या आजारातून पूर्णपणे बरे झाल्यानंतरही रुग्णांच्या एका गटाला या संसर्गाचे परिणाम आयुष्यभर सहन करावे लागू शकतात, असे डॉक्टरांनी नमूद केले.

शारीरिक, मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देणे गरजेचे

डॉक्टरांबरोबर संपर्कात राहा आणि त्यांना तुमच्या आरोग्याविषयीची महत्त्वाची माहिती देत राहा. कोविडनंतर प्रकृती कशाप्रकारे सुधारत आहे, याचे निदान डॉक्टरांना करायचे असते. काही चाचण्या करून घेण्याची गरज असेल, जीवनशैलीत काही बदल घडवून आणायचे असतील किंवा औषधांमध्ये काही बदल करायचे असतील तर तशा सूचना डॉक्टर करतात. या आजारातून पूर्णपणे बरे होण्यासाठी औषधोपचार काटेकोरपणे सुरू ठेवणे, डॉक्टरांच्या भेटीची वेळ न चुकवणे, सकस आहार, चांगली झोप आणि सकारात्मक विचार करणे गरजेचे आहे.

पोस्ट कोविड काळात राष्ट्रीय आरोग्य सेवेने निश्चित केलेली त्रिःसूत्री

धिम्या गतीने पुढे जा - बरे झाल्यानंतर नेहमीचे आयुष्य पूर्ववत जगण्याची घाई करू नका. त्याला जितका वेळ लागेल तितका द्या. कामाच्या वेळापत्रकाला ताबडतोब जुंपून घेण्यासाठी तुमच्या शरीरावर जबरदस्ती करू नका. दैनंदिन कामांचे नियोजन करताना छोट्या-छोट्या मध्यंतरासाठीही वेळ राखून ठेवा. दोन कामांच्या मध्ये विश्रांती घ्या.

नियोजन करा - आपली आठवडाभरातील कामे अंतराअंतराने करा. आपल्याला रोजच्या रोज लागणाऱ्या वस्तू जवळपासच असतील आणि सहज सापडतील अशाप्रकारे आपल्या घराची नव्यानं मांडणी करण्याचा विचार तुम्ही करू शकता.

प्राधान्यक्रम ठरवा - आपल्या दैनंदिन कामांच्या यादीचे दोन भाग करा. कोणती काम तुम्ही स्वत: करू शकता आणि बाहेर जाऊन वस्तू आणणे, पाळीव प्राण्यांची काळजी घेणे, घरातील वयोवृद्ध व्यक्तींना व मुलांना सांभाळणं अशासारखी कोणती कामे करण्यासाठी तुम्हाला इतरांची मदत लागेल, यानुसार हे गट पाडा. शक्य असल्यास घराबाहेरची कामे कुटुंबातील इतर सदस्यांनी सांभाळणे योग्य ठरेल.

............................................