मुंबई : मुंबईच्या हाजीअली दर्ग्यावर दहशतवादी हल्ला होण्याच्या फोनने गुरुवारी खळबळ उडाली. फोन आल्यानंतर तत्काळ ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संपूर्ण परिसराची तपासणी केली. मात्र, काहीही आढळून आले नाही. दरम्यान, तांत्रिक पुराव्याच्या मदतीने तपास केला असता पोलिसांनी शुक्रवारी उल्हासनगर येथून एकाला ताब्यात घेतले. तो मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास फोन आला. फोनवरील व्यक्तीने हाजीअली येथे दहशतवादी येणार असल्याचे सांगितले. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी नोंद करत घटनास्थळी धाव घेतली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण परिसर पिंजून काढला. पोलिसांनी हाजी अली दर्ग्याच्या आजूबाजूचा परिसर, एल अँड टी येथील कोस्टल रोड प्रोजेक्टच्या साइटची तपासणी केली. पण काहीही हाती लागले नाही. प्राथमिक तपासात कॉल खोटा असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या मदतीने कॉलधारकाची माहिती घेण्यास सुरुवात केली. मात्र त्याचा मोबाइल बंद होता. तपासात फोन करणारी व्यक्ती उल्हासनगर येथील असल्याचे समजले. शुक्रवारी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून तो मानसिक रुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. ताडदेव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
यापूर्वी आलेले धमकीचे कॉल...
२० ऑकटोबर : अंधेरीतील इन्फिनिटी मॉल, जुहू येथील पीव्हीआर मॉल आणि विमानतळावरील सहारा हॉटेल येथे बाॅम्बस्फोट होणार असल्याच्या कॉलने खळबळ उडाली. त्यापाठोपाठ सांताक्रूझ येथील प्रसिद्ध हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट करणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार, पोलिसांनी संपूर्ण हॉटेलची तपासणी केली. मात्र तपासणीत हा कॉल खोटा असल्याची माहिती समोर आली. दारूच्या नशेत सूरज धर्मा जाधव (३४) याने कॉल केल्याची माहिती तपासात समोर आली.