Join us

११ ठिकाणे बॉम्बने उडवण्याची धमकी! ‘खिलाफत इंडिया’ आयडीवरून RBIला मेल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 5:43 AM

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ईमेल आयडीवर खिलाफत इंडिया या मेल आयडीवरून एक धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): सरत्या वर्षाला निरोप देण्याची लगबग सुरू असतानाच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत ईमेल आयडीवर खिलाफत इंडिया या मेल आयडीवरून एक धमकीचा मेल आल्याने खळबळ उडाली आहे. बँकेच्या मुख्यालयासह मुंबईतील ११ ठिकाणी बॉम्बहल्ला करण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी एमआरए मार्ग पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

आरबीआयचे (रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया) प्रमुख सुरक्षारक्षक संजय हरिश्चंद्र पवार (वय ५९) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, सुरक्षा कर्मचाऱ्यांना जबाबदारीचे वाटप करण्याबरोबर सुरक्षेच्या दृष्टीने प्राप्त होणारे ई-मेल चेक करून त्याबाबतची माहिती वरिष्ठांना देण्याचे काम करतात. मंगळवारी सकाळी १०.५० च्या सुमारास ‘खिलाफत इंडिया’ या आयडीवरून आरबीआयच्या अधिकृत ई-मेलवर धमकीचा मेल आल्याचे लक्षात आले. 

मेलमध्ये काय म्हटलंय...

या मेलमध्ये मुंबईमध्ये ११ वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्ब ठेवल्याचे नमूद आहे. आरबीआयसह खासगी बँकांनी भारतातील सर्वांत मोठा घोटाळा केला आहे. यामध्ये रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बँकिंग क्षेत्रातील काही उच्चपदस्थ अधिकारी आणि काहीजणांचा समावेश आहे, असे मेलमध्ये म्हटले आहे. संबंधितांनी राजीनामा देऊन घोटाळा केल्याचे मान्य करावे; अन्यथा फोर्टच्या आरबीआय बँक, चर्चगेटच्या एचडीएफसी हाऊस, बीकेसीतील आयसीआयसीआय टॉवर येथे तीन बॉम्बस्फोट करण्यात येणार असल्याचे मेलमध्ये नमूद करण्यात आले आहे. यामध्ये त्यांना दीड वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती. 

संशयास्पद वस्तू आढळली नाही   

आरबीआय कार्यालयाची तपासणी करण्यात आली. कुठेही संशयास्पद वस्तू आढळून आलेली नाही. नागरिकांमध्ये भीती निर्माण केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेल पाठवणारी व्यक्ती कोण आहे? तिने हा मेल का केला? याबाबत मुंबई पोलिसांसह गुन्हे शाखा अधिक तपास करीत आहे.

 

टॅग्स :भारतीय रिझर्व्ह बँकगुन्हेगारी