अतिवृष्टीचा धोका तीन तास आधीच कळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 08:17 AM2024-09-23T08:17:26+5:302024-09-23T08:18:03+5:30
नवीन चार रडारमुळे आता एकूण रडारची संख्या सहा होणार आहे.
सुनील कांबळे
प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग प्रमुख
मुंबई महानगर प्रदेशात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती नागरिकांना तीन तास अगोदर उपलब्ध व्हावी यासाठी आता विलेपार्ले, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलमध्ये चार नवीन एक्स बैंड रडार बसविण्यात आले आहेत. याद्वारे मिळणारी माहिती म्हणजे पूर्वसूचना मुंबई महानगर प्रदेशातील महापालिका, विमानतळासह उर्वरित प्राधिकरणांना म्हणजे त्यांच्या नियंत्रण कक्षाला दिली जाईल. जेणेकरून संबंधित यंत्रणा अलर्ट मोडवर जातील आणि होणारी हानी टाळता येईल, हा प्रमुख उद्देश चार नवे रडार बसविण्यामागचा आहे. याद्वारे हवामानाचे निरीक्षण देण्याच्या कामात ९५ टक्के अचूकता येईल. केंद्रीय पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाच्या अधिपत्याखाली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजीकडून चार नवीन रडार बसवले आहेत. याची देखभाल-दुरुस्ती रडारशी संबंधित कंपन्यांकडून केली जाईल. रडार बसविण्याचा हा अर्बन प्रोजेक्ट आहे. मुंबईसह कल्याण, पनवेल, विरारसह १०० किमीच्या परिसराला रडारचा फायदा होणार आहे. यामुळे हवामानाचे प्रत्येक अपडेट मिळतील. याद्वारे शक्यतो हवामानाच्या प्रत्येक हालचालीवर आपल्याला लक्ष ठेवता येईल. नवीन चार रडारमुळे आता एकूण रडारची संख्या सहा होणार आहे.
आपल्याकडे एकूण तीन प्रकाराचे रडार आहेत. यात एस बैंड, सी बँड आणि एक्स बैंड रडारचा समावेश आहे. हवामानामधील प्रत्येक घडामोड म्हणजे किती आणि कुठे पाऊस पडणार आहे. विजा कुठे चमकू शकतात. अतिवृष्टी कोठे आणि किती होऊ शकते? याची माहिती मिळेल आणि तशा सूचना करता येतील. आता वेरावलीमध्ये सी बँड रडार आहे. त्याचा परीघ ४०० किमी आहे. कुलाबा येथे एस बँड रडार आहे. त्याचा परीघ ५०० किमी आहे. नव्या चार एक्स बैंड रडारचा परीघ १०० किमी आहे. आपल्याकडे दोन रडार असताना नवीन चार रडार लावण्यात आले. याचे कारण म्हणजे आपल्याकडे गगनचुंबी इमारती आहेत. त्यामुळे काही ठिकाणी हवामानाचे अंदाज वर्तवताना अडचणी येत आहेत. नव्या रडारच्या मदतीने आपण मुंबईकडे एका वेगळ्या नजरेतून पाहणार आहोत. त्यामुळे सगळीकडे लक्ष ठेवता येईल. यापूर्वीच्या दोन रडारच्या माध्यमातून १५ मिनिटांनी माहिती घ्यावी लागत होती. आता चार नव्या रडारद्वारे पाच मिनिटांनी माहिती मिळणार आहेत. हवामान विभागाद्वारे याची माहिती प्रसारित केली जाईल.
रडार आणि उपग्रह याचा काही एक संबंध नाही. रडार हे जमिनीवरून हवामानाची निरीक्षणे नोंदवितात. जमिनीवरून निरीक्षण नोंदविताना हवामानाची पूर्वसूचना मिळणार आहे.
आता आपण मुंबईच्या हवामानाकडे वेगवेगळ्या सहा अँगलने बघणार आहोत. किती पाऊस पडणार, किती ढंग आहेत, कोणत्या प्रकाराचे ढग आहेत, गारांचा पाऊस कुठे पडणार आहे, विजा कुठे चमकू किती पाऊस पडू शकतो? अशी माहिती मिळणार आहे.
रडारच्या चित्रांमुळे आपल्याला मुंबईमध्ये पुढील तीन तासांत कुठे अतिवृष्टी होणार? याची पूर्वसूचना रडारद्वारे मिळणार आहे. उदा. दुपारी १२ वाजता अतिवृष्टी होणार असेल तर त्याची माहिती मुंबईकरांना सकाळी ९ वाजताच मिळेल. पावसाचे चार महिने सोडले, तर वर्षाचे बारा महिने हे रडार ऑपरेशनल मोडमध्ये राहतील. वाऱ्याची दिशा आणि गती याची माहितीही याद्वारे मिळणार आहे. जमिनीपासून १० किमीपर्यंत वाऱ्याची स्थिती कशी आहे, याची माहिती मिळेल.