मित्राची मस्करी, तरुण तुरुंगात...; गोव्यातून तरुणाला आलेल्या व्हॉट्सॲप संदेशांनी उडाली खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 05:12 PM2023-07-08T17:12:54+5:302023-07-08T17:15:31+5:30
पोलिसांनी गोव्यातून रमेशकुमार यादव (३२) या तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
मुंबई : नवीन सीमकार्ड घेतल्यानंतर मित्राची केलेली मस्करी एका तरुणाला भलतीच महागात पडली आहे. नवीन सीमकार्ड घेत एकाने मित्राला ‘ट्रेन मे भीड होगी... काम को अंजाम देना है...’ असा संदेश पाठवला आणि घाबरलेल्या मित्राने थेट पोलीस ठाणे गाठल्याने तरुणाला कोठडीची हवा खावी लागली आहे. पोलिसांनी गोव्यातून रमेशकुमार यादव (३२) या तरुणाला ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरू आहे.
भांडुप परिसरात राहणारा सागर मोळावडे (३२) हा खासगी कंपनीत नोकरी करतो. ६ जुलै रोजी रात्री ८ वाजता काम संपवून घरी आल्यानंतर, मोबाइलमध्ये व्हॉट्सॲप तपासत असताना एका अनोळखी क्रमांकावरून ‘कल ९ बजे प्लॅनिंग है, पुरा ट्रेन पॅक होगा... हमारे मनसुबे मुक्कमल होगे ... खुदा हाफिज’ असा संदेश त्याला दिसला. त्याचा स्क्रिनशॉट काढून, कोणीतरी मस्करी करत असल्याचे समजून सागरने त्याकडे दुर्लक्ष केले. मेसेजही डिलीट केले. त्यानंतर, साडेआठ वाजता आणखीन एक मेसेज धडकला. त्याचाही स्क्रीनशॉट काढून घेतला. त्यातही ‘कल ट्रेन मे भीड होगी, उसी दौराना काम को अंजाम देना है’ असा मजकूर होता. अखेर, भीती वाटल्याने सागरने मोबाइल क्रमांक ब्लॉक करत पोलीस ठाणे गाठत पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर तांत्रिक पुराव्याच्या आधारे पोलिसांनी गोव्यातून सागरच्या मित्राला ताब्यात घेतले.
या प्रकरणी गोव्यातून तक्रारदाराच्या मित्राला ताब्यात घेतले आहे. दोघेही वर्षभरापूर्वी एकत्र काम करत होते. याचदरम्यान त्याने नवीन सिमकार्ड घेतल्याने मस्करीत ते संदेश त्याला पाठवले. तक्रारदाराने घाबरून कार्ड ब्लॉक केल्याने तरुणाशी पुन्हा संपर्क होऊ शकला नाही. पोलिस त्याच्या घरी पोहोचल्यानंतर सर्व उलगडा झाला.
- पुरुषोत्तम कराड, पोलिस उपायुक्त