मुंबई-
राज्याच्या राजकारणात सध्या राज ठाकरेंच्या भाषणांनी वातावरण तापलेलं असताना त्यांच्या उद्याच्या औरंगाबादमधील सभेचीही उत्सुकता लागून राहिली आहे. त्यासाठीची जोरदार तयारी मनसेकडून केली जात आहे. दरम्यान राज ठाकरेंचं आक्रमक व्यक्तीमत्व आणि त्यांच्या रोखठोक भूमिका यामुळे त्यांना आजवर आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांनाही सामोरं जावं लागलं आहे. याबाबतचा एक किस्सा राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सांगितला आहे. राज ठाकरेंना दुबईहून जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता आणि तो फोन मीच उचलला होता, अशी एक आठवण शर्मिला ठाकरे यांनी सांगितली आहे.
एपीबी माझा वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात राज ठाकरे आणि शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या. अनौपचारिक गप्पांच्या या कार्यक्रमात शर्मिला ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतचे अनेक किस्से आणि आठवणी यावेळी शेअर केल्या. राज ठाकरेंची व्यासपीठावरील आक्रमकता पाहता त्यांचे दौरे वगैरे, आंदोलनं यावेळी मनात धाकधूक असते का? असं शर्मिला ठाकरे यांना विचारण्यात आलं असता त्यांनी एक किस्सा कथन केला.
"धाकधूक तर असतेच. पण आता मोबाइल वगैरे सारंकाही आहे. त्यावेळी सारंकाही लँडलाइनवर अवलंबून राहावं लागत असायचं. तेव्हा ते दोन-दोन महिने दौऱ्यावर असायचे आणि ते सर्किट हाऊसला पोहोचणार मग त्यानंतर आमचं त्यांच्याशी बोलणं होणार. यासाठी मग आम्ही रात्रभर त्या फोनची वाट पाहायचो. पण आता तसं काही राहिलेलं नाही. आता मोबाइल फोन आहेत. इतर गोष्टी आहे. सहज संपर्क साधणं शक्य होतं", असं शर्मिला ठाकरे म्हणाल्या.
"आमच्या घरात आधी टेलिफोन ऑपरेटर वगैरे नव्हता. त्यावेळीही खूप फोन राज यांना यायचे आणि ते घरचे लोकच उचलायचे. एकदा एक फोन मीच उचलला होता आणि तो दुबईहून आला होता. त्याला नीट राहायला सांगा नाहीतर बघून घेऊ अशी धमकीच समोर आली होती. त्यामुळे असे प्रसंग होत असतात", असं शर्मिला ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.