सीमा हैदरचं नाव घेत पुन्हा २६/११ सारखा हल्ला करण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 09:44 AM2023-07-19T09:44:17+5:302023-07-19T09:45:04+5:30
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे धमकीचा व्हॉट्सॲप
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईवर पुन्हा एकदा २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याच्या धमकीचा संदेश मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाकडे आला. या धमकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचाही उल्लेख करण्यात आला आहे. याप्रकरणी वरळी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत सोमवारी तपास सुरू केला आहे. त्यापाठोपाठ वाहतूक आणि मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आणखी दोन संदेश आणि कॉलची भर पडली. पोलिसांसह गुन्हे शाखा याप्रकरणी अधिक तपास करत आहे.
वरळी पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षात १२ जुलैला सायंकाळी साडेचारच्या सुमारास व्हॉट्सॲप संदेश आला. त्यात आमचे काही शूटर भारतीय असून, यूपी सरकार व मोदी सरकार आमच्या निशाण्यावर आहेत. तसेच काही ठिकाणी काडतुसे व एके ४७ आहेत. मुंबईत पुन्हा २६/११ प्रमाणे दहशतवादी हल्ला करणार या आशयाचा मजकूर नमूद होता. हा संदेश आखाती देशातून आल्याचे समोर येत आहे. संदेश पाठविणाऱ्या मोबाइलधारकाविरुद्ध वरळी पोलिसांनी धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. वाहतूक नियंत्रण कक्षाच्या सहायक पोलिस निरीक्षक शुभांगी अशोक ढगे (३४) यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदवला. पोलिस अधिक तपास करत आहेत.
आखाती देशातील तरुणावर संशय
पाठविण्यात आलेल्या धमकीच्या संदेशामागे मध्य प्रदेशचा रहिवासी असलेल्या तरुणावर संशय आहे. तो कामगार असून, सध्या कामानिमित्त आखाती देशात आहे. तोच हे संदेश पाठवत असल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र, तो आखाती देशात असल्यामुळे त्याच्यापर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहेत. सध्या शासन स्तरावर त्याच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असून, त्याच्या चौकशीतून अशा धमकीच्या संदेशांना ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याच्याविरुद्ध मध्य प्रदेशात अशाच प्रकारे संदेश पाठविल्याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. भारतात कुठेही काही घडामोड झाल्यास तो अशा प्रकारचे संदेश करत असल्याचा संशय एका अधिकाऱ्याने वर्तवला.
सीमा हैदर एजंट है...
वाहतूक नियंत्रण कक्षात सोमवारी सीमा हैदरशी संबंधित दुसरा धमकीचा संदेश आला. पाकिस्तानमधील क्रमांकावरून आलेल्या संदेशात, “प्लीज सीमा को इंडिया से निकाल दो. ये एजंट है, ये इंडिया को नुकसान देगा, मै लास्ट टाइम बता रहा हूँ, आगे आपकी मर्जी है” असा मजकूर त्यात आहे. यापूर्वी १२ जुलैला आलेल्या संदेशातही, “सीमा हैदर परत आली नाही, तर भारताचा नाश, २६/११ प्रमाणे परत हल्ला, स्वतःला तयार करा, या संपूर्ण कृत्याला उत्तर प्रदेश सरकार जबाबदार असल्याचे’’ संदेशात म्हटले आहे. याबाबतही तपास सुरू आहे. या तिन्ही संदेशांचे एकमेकांशी काही कनेक्शन आहे का, या दिशेनेही अधिक चौकशी सुरू आहे.
घाटकोपरमध्ये तरुणांच्या बॅगेत बॉम्ब
नियंत्रण कक्षात येणाऱ्या धमकी संदेशाचा तपास सुरू असतानाच, सोमवारी रात्री साडेआठ वाजता, मुख्य नियंत्रण कक्षात एका व्यक्तीने कॉल करुन दिलेल्या माहितीत, घाटकोपर एलबीएस मार्ग येथे श्रेयस टॉकीजजवळ तीन संशयित एका बॅगेसह उभे दिसले. संशय आल्याने त्याने त्यांची बॅग तपासली असता, त्यात त्याला बॉम्ब सापडला. याबाबतचा कॉल करणाऱ्याला बॉम्बची माहिती कशी समजली, अशी विचारणा करताच त्याला राग आला. मी पोलिसांची मदत केली, बाकी मला काही विचारायचे नाही, असे सांगून त्याने कॉल कट केला. याबाबतही पोलिस अधिक तपास करत आहेत.