फडणवीसांना धमकी, देणाऱ्याची कोठडी रद्द
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 02:34 PM2024-03-07T14:34:51+5:302024-03-07T14:36:17+5:30
फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याचा व्हिडीओ योगेश सावंतच्या फेसबुकवरून शेअर करण्यात आल्याची तक्रार अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली.
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी असलेला व्हिडीओ शेअर केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार) कार्यकर्ता योगेश राजेंद्र सावंत (वय २९) याला ठोठावण्यात आलेली पाच दिवसांची पोलिस कोठडी उच्च न्यायालयाने बुधवारी रद्द केली.
फडणवीस यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याचा व्हिडीओ योगेश सावंतच्या फेसबुकवरून शेअर करण्यात आल्याची तक्रार अक्षय पनवेलकर यांनी सांताक्रूझ पोलिस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून सावंत याच्यावर गुन्हा दाखल झाला. २९ फेब्रुवारीला सावंतला अटक केली असून वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.
पोलिसांनी सावंतला कोणतीही नोटीस न बजावता न्यायालयीन कोठडीला सत्र न्यायालयात आव्हान दिले. त्यानंतर न्यायालयाने सावंतला ७ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सत्र न्यायालयाने कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता कोठडी सुनावल्याचे सावंत यांनी याचिकेत म्हटले होते. योगेश सावंत आधीच न्यायालयीन कोठडीत आहेत आणि त्याची कोठडी रद्द करून ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यासंदर्भात त्याला नोटीस बजावली नाही व त्याची बाजूही ऐकण्यात आली नाही, असे म्हणत न्या. आर. एन. लड्ढा यांच्या एकलपीठाने सावंत यांची पोलिस कोठडी रद्द केली.