छगन भुजबळ यांना धमकी; शासकीय निवासस्थानी वाढवली अतिरिक्त सुरक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 01:53 PM2023-11-07T13:53:04+5:302023-11-07T13:54:45+5:30
छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानावर आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे.
मुंबई: एकीकडे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून, सरकारला पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी सरसकट मराठा प्रमाणपत्राला विरोध दर्शवला आहे.
आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला बोलायला पाहिजे, जर आपण गप्प बसलो तर आपल्याला कोणीही मदत करायला येणार नाही. त्यामुळे आता थोडी दहशत माजवायची आणि जे पाहिजे करुन घ्यायचे, समोरच्या दरवाज्यातून प्रवेश मिळत नाही म्हणून मागच्या दरवाज्यातून प्रवेश मिळवायचे काम सुरू आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
छगन भुजबळ यांच्या या विधानावर आता राज्यभरातून विविध प्रतिक्रिया येत आहे. याचपार्श्वभूमीवर छगन भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला जाहीरपणे मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध दर्शवला आहे. त्यांच्या भूमिकेनंतर मराठा समाजातील काही लोकांकडून भुजबळ यांना धमकी देण्यात आली. त्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव छगन भुजबळ यांच्या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
छगन भुजबळांच्या शासकीय निवासस्थानी अतिरिक्त सुरक्षा वाढविण्यात आली आहे. pic.twitter.com/kQet6uA2Sm
— Lokmat (@lokmat) November 7, 2023
दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेला आला, तेव्हा छगन भुजबळ हेही उपस्थित होते. मंत्रिमंडळाची भूमिका अतिशय स्पष्ट होती. आता अस्तित्वात असणाऱ्या कोणत्याही समाजाच्या, जातीच्या आरक्षणाला तीळमात्र धक्का न लावता मराठा समाचाला आरक्षण द्यायचे आहे. अशातच छगन भुजबळ यांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झाला आहे. ज्येष्ठ नेते आणि जबाबदार मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी केलेले विधान आश्चर्यकारक आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही, हे त्यांनाही माहिती आहे. या सर्व प्रक्रियेत ते सहभागी आहेत, असे शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटले आहे.