मोठी बातमी! राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:49 AM2023-06-09T10:49:45+5:302023-06-09T11:43:33+5:30
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मुंबई- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात आता खासदार सुप्रिया सुळे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी दाखल झाल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून राज्यात नेत्यांना जीवे मारण्याची धमकी मिळत आहेत. आता शरद पवार यांच्या संदर्भातही आक्षेपार्ह ट्विट करत धमकी दिली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे.
काही वेळापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह काही पदाधिकारी पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी गेले आहेत. शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरुन पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. तात्काळ या व्यक्तींना अटक करावी अशी मागणीही केली आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादी आंदोलन करणार आहे.
भाजप नेते निलेश राणे यांनी देखील आक्षेपार्ह ट्विट केलं होतं, त्यांच्यावरही कारवाई व्हावी अशी मागणी राष्ट्रवादीने केली आहे.
या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी. ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेश बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण अॅडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या काॅमेंटर वाचल्या एवढा द्वेश कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.
मी एक महिला म्हणून आणि एक नागरिक म्हणून महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना न्याय मागत आहे. जर काही चुकीच झालं तर त्याला जबाबदार राज्याचं गृहखातं असेल. ज्या विश्वासानं लोक महाराष्ट्रात राहतात त्यांनी आता काय वाटतं असेल. यावर कारवाई व्हावी, असंही खासदार सुळे म्हणाल्या.