आमदार नितीन देशमुख यांच्या जीवाला धोका?; IPS अधिकाऱ्यानं दिलाय सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2023 03:57 PM2023-04-20T15:57:57+5:302023-04-20T16:14:15+5:30

आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात १० एप्रिलपासून अकोला येथून जलसंघर्ष यात्रा सुरू झाली होती.

Threat to Shivsena MLA Nitin Deshmukh's life?; IPS officer advised in nagpur and akola | आमदार नितीन देशमुख यांच्या जीवाला धोका?; IPS अधिकाऱ्यानं दिलाय सल्ला

आमदार नितीन देशमुख यांच्या जीवाला धोका?; IPS अधिकाऱ्यानं दिलाय सल्ला

googlenewsNext

मुंबई/अकोला - शिवसेना ठाकरे गटाचे आमदारनितीन देशमुख यांना पोलिसांनी नागपूरच्या वेशीवर अडवून ताब्यात घेतले आहे. आमदार देशमुख यांनी अकोला-अमरावतीच्या खारपट्ट्यातील पाणी प्रश्नावर संघर्ष यात्रा सुरू केली होती. देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसह अकोल्याहुन नागपूरच्या दिशेने निघाले. मात्र, त्यांच्या यात्रेला नागपूरच्या वेशीवरच रोखण्यात आलं असून त्यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आता, देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना, आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. तसेच, एका आयपीएस अधिकाऱ्याने मला, सावधगिरीने राहण्याचा सल्लाही दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. 

आमदार नितीन देशमुख यांच्या नेतृत्त्वात १० एप्रिलपासून अकोला येथून जलसंघर्ष यात्रा सुरू झाली होती. अकोला ते नागपूर निघालेली ही पायी यात्रा उद्या फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानी धडकणार होती. पाण्यासंदर्भातील समस्येवरून देशमुख आपल्या कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री व अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानापुढे जाऊन आंदोलन करणार होते. मात्र, त्यापूर्वीच देशमुख आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलीस ताब्यात घेतलं आहे. त्यावरुन, आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी 'सरकार जनतेलाच घाबरू लागले' म्हणत ट्विट करून राज्य सरकारवर टीका केलीय. तर, आता देशमुख यांनीही आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. 

अकोल्यात नितीन देशमुख यांना आणण्यात आलेल्या पोलिसांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी अडविले. आमदार देशमुखांना पोलिस अधिक्षक कार्यलयात हजर केल्यानंतर त्यांना थोड्या वेळाने सोडून देण्यात आलं. दरम्यान आमदार नितीन देशमुख यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय. एका आयपीएस अधिकाऱ्यांनी नाव न सांगता ही माहिती दिली. आपण सावध राहावे असाही सल्ला त्या आयपीएस अधिकाऱ्यानं दिला आहे, अशी माहिती देशमुख यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. 

दरम्यान, पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली व माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे. मात्र, काहीही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
 

Web Title: Threat to Shivsena MLA Nitin Deshmukh's life?; IPS officer advised in nagpur and akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.