हुंड्यासाठी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी; लग्नानंतरही पैशाची मागणी, उच्चभ्रू वसाहतीतील वास्तव उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 03:18 AM2018-01-21T03:18:09+5:302018-01-21T03:18:35+5:30
उच्चशिक्षित, देखणा तसेच चांगल्या पदावर काम करणारा जावई मिळाला म्हणून वडिलांनी थाटामाटात मुलीचे लग्न लावून दिले. मुलगी सुखात राहावी म्हणून जावयाला बंगळुरूमध्ये फ्लॅट, गाडीसह ८५ लाखांचा हुंडा आणि २५ लाखांचे दागिने असा कोट्यवधी रुपयांचा हुंडा सासरच्या मंडळींना दिला.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : उच्चशिक्षित, देखणा तसेच चांगल्या पदावर काम करणारा जावई मिळाला म्हणून वडिलांनी थाटामाटात मुलीचे लग्न लावून दिले. मुलगी सुखात राहावी म्हणून जावयाला बंगळुरूमध्ये फ्लॅट, गाडीसह ८५ लाखांचा हुंडा आणि २५ लाखांचे दागिने असा कोट्यवधी रुपयांचा हुंडा सासरच्या मंडळींना दिला. मात्र पती आणि सासरच्या मंडळींची भूक भागत नव्हती. लग्नानंतर हुंड्यासाठीची मागणी वाढली. तिने नकार देताच तिचा मानसिक, शारीरिक छळ सुरू झाला. विकृती म्हणजे हुंड्यासाठी पत्नीचेच अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर तिने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत याबाबत तक्रार दिली. उच्चभ्रू वसाहतीतील हे धक्कादायक वास्तव उघडकीस आले. तिच्या तक्रारीवरून आग्रीपाडा पोलिसांनी हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासू - सासºयांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
सातरस्ता परिसरात २६ वर्षांची नेहा (नावात बदल) कुटुंबीयांसोबत राहते. ती उच्चशिक्षित असून खासगी समुपदेशक म्हणून काम करते. २०१३मध्ये तिचा याच परिसरातील रमेश (३४, नावात बदल) सोबत विवाह झाला. रमेश हा एका खासगी कंपनीत चांगल्या पदावर कामाला आहे. विवाहादरम्यान तिच्या वडिलांनी सासरच्या मंडळींना ८५ लाख रुपयांचा हुंडा दिला; शिवाय मुलीला २५ लाखांचे दागिने दिले. विवाहाच्या काही दिवसांनंतर हे दागिनेही सासरच्या मंडळींनी स्वत:कडे घेतले.
बंगळुरूमध्ये फ्लॅट घेण्यासाठीही नेहाला घरच्यांकडून पैसे आणण्यास सांगितले. मुलीच्या सुखासाठी वडिलांनी बंगळुरूच्या फ्लॅटचाही खर्च भागवला. मात्र कालांतराने सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी तिचा छळ सुरू झाला. वेळोवेळी पैसे पुरवूनही त्यांची भूक भागत नव्हती. त्यांनी तिच्याकडून पुन्हा पैसे मागण्यास सुरुवात केली. मात्र या वेळी नेहाने नकार दिला. त्यामुळे नेहाचा मानसिक, शारीरिक छळ सुरू झाला. ती सर्व समजूतदारपणे घेत होती. दरम्यान, पतीने तिच्यासोबतच्या क्षणांचे काढलेले अश्लील फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सासू-सासरेही त्याच्याच बाजूने होते. अखेर घाबरून ती माहेरी निघून आली.
वडिलांसह आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून तिने तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू, सासºयाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे एस. आगवणे यांनी दिली.