धमकी मिळालेल्या शेफने घेतली पोलीस आयुक्तांकडे धाव
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 10:26 PM2018-07-12T22:26:22+5:302018-07-12T22:26:40+5:30
स्वसरंक्षणासाठी केली मागणी; गृहमंत्र्यांजवळ देखील केला पत्रव्यवहार
मुंबई - संजू चित्रपटाविरोधात भाष्य केल्यानंतर इंटरनॅशनल कॉलवरून धमकी मिळाल्यानंतर शेफ तुषार देशमुखने माहीम पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, माहीम पोलीस ठाण्याकडून काहीही प्रतिसाद मिळत नसल्याने तसेच जीवास धोका निर्माण झाल्यामुळे तुषारने स्वसरंक्षणासाठी गृहमंत्री रणजित पाटील यांना पत्रव्यवहार केला. तसेच पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैसवाल यांची देखील भेट घेतली.
आज जवळपास आठ दिवस या घटनेला होत आले. मात्र, माहीम पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळत नसून मला आलेला तो इंटरनॅशनल फोन नंबर कोणाचा याचा अद्याप तपास लागलेला नाही. त्यामुळे मी पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैसवाल यांची भेट घेऊन माझ्या जीवास धोका होऊ नये म्हणून स्वसरंक्षणाची मागणी केली आहे असे तुषार देशमुख यांनी सांगितले. त्यावर पोलीस आयुक्त जैसवाल यांनी स्वतः लक्ष घालून स्वसरंक्षणाबाबत विचार करू असे देशमुख यांनी पुढे सांगितले.