मुंबई - कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेले एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. वानखेडे यांच्या विरोधातील एफआयआर योग्यच असल्याचा दावा करत सीबीआयने मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. तसेच, सीबीआयने वानखेडेंच्या याचिकेवर आक्षेप घेत याचिका फेटाळून लावण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे समीर वानखेडे यांनी आपणास जीवे मारण्याची धमकी येत असल्याचा दावा केला आहे.
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणातून सोडून देण्यासाठी समीर वानखेडे यांनी २५ कोटी रुपयांची मागणी शाहरुखकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सीबीआयने वानखेडेंविरोधात एफआयआर दाखल केला असून तो रद्द करण्यात यावा, अशी मागणी करीत वानखेडे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. मात्र, ही याचिका योग्यच असल्याचे सीबीआयने कोर्टात म्हटले आहे. त्यामुळे, वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे आपण जावी धोक्यात असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटले आहे.
आर्यन खान क्रुझ ड्रग्ज प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी लक्ष घातले होते. त्यांनी समीर वानखेडे यांच्याव गंभीर आरोपही केले होते. दरम्यान, कुख्यात गुंड दाऊत इब्राहीमशी संबंधित व्यक्तींकडून जागा खरेदी केल्याच्या आरोपावरुन सध्या नवाब मलिक तुरुंगात आहेत. यादरम्यान, मला डॉन दाऊद इब्राहिमच्या नावाने जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचं वानखेडे यांनी म्हटलं आहे. खोट्या ट्विटर अकाऊंटवरुन त्यांना ही धमकी आल्याचा दावा वानखेडे यांनी मुंबई पोलिसांकडे केला आहे. त्यांनी मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे यासंदर्भात तक्रारही केली. तसेच, मला वा माझ्या कुटुंबीयांस काही झाल्यास जबाबदार कोण? असा सवालही वानखेडे यांनी केला आहे.