मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना धमकीचे फोन; एक जण घेतला ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:19 AM2022-08-16T07:19:44+5:302022-08-16T07:20:08+5:30
Mukesh Ambani : डी. बी. मार्ग पोलिसांनी फोन करणाऱ्या ५६ वर्षीय विष्णू भौमिक नावाच्या व्यक्तीला दहिसर येथून ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
मुंबई : अँटिलिया धमकी प्रकरणानंतर प्रख्यात उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेल्या धमकीच्या फोनने खळबळ उडाली आहे. अंबानी यांच्या रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये धमकीचे ८ फोन आले होते. डी. बी. मार्ग पोलिसांनी फोन करणाऱ्या ५६ वर्षीय विष्णू भौमिक नावाच्या व्यक्तीला दहिसर येथून ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एच. एन. रिलायन्स रुग्णालयाचे सीईओ डॉ. तरंग ज्ञानचंदानी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रुग्णालयात झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी साडेदहापासून फोन सुरू झाले. पावणेअकरा ते बाराच्या दरम्यान मुकेश अंबानी यांना दिलेल्या धमकीचे तब्बल ८ ते ९ फोन आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसांना कळवताच पोलिसांनी गुन्हा नोंदविला. मोबाइल क्रमांकांच्या आधारे आरोपीचे लोकेशन शोधले.
अंबानी यांच्या घराबाहेर एसआरपीएफच्या जवानांसह पोलीस बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे. प्राथमिक तपासात फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती समोर येत आहे.
धमकी देणारे पत्र
गेल्या वर्षी फेब्रुवारीत अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओमध्ये अंबानी कुटुंबीयांना धमकी देणारे पत्र मिळाले होते. ती स्कॉर्पिओ मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यानेच तेथे ठेवल्याचे उघडकीस आले होते. ती गाडी देणारा मित्र मनसुख हिरण याने नाव उघड करू नये यासाठी वाझेने त्याची हत्या केल्याचे आढळले.