आसामी अल्पवयीनाच्या ईमेल आयडीवरून धमकीचे ईमेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2024 09:35 AM2024-01-16T09:35:36+5:302024-01-16T09:35:49+5:30
व्हिडिओ गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने या मुलाला जाळ्यात ओढून त्याच्याकडून हा ईमेल तयार करू घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
मुंबई : मुंबईसह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ई-मेल आसाममधील १२ वर्षाच्या मुलाच्या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे. व्हिडिओ गेम खेळताना अनोळखी व्यक्तीने या मुलाला जाळ्यात ओढून त्याच्याकडून हा ईमेल तयार करू घेतल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे.
कुलाब्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आणि वरळीतील नेहरू विज्ञान केंद्रासह देशातील प्रमुख संग्रहालयांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे आठ ईमेल ५ जानेवारीला मिळाले होते. हे ईमेल खोटे असल्याचे समोर येताच पोलिसांनी संग्रहालयाच्या अवतीभवती बॉम्बशोधक पथकासह बंदोबस्त तैनात केला होता. तांत्रिक पुराव्यांच्या मदतीने यामागील आसाम कनेक्शन उघडकीस आले. आसामाती १२ वर्षाच्या मुलाच्या ईमेल आयडीवर धमकीचे ईमेल पाठवल्याचे समोर आले.
गुन्हे शाखेच्या पथकाने आसाम गाठले. मुलाकडे चौकशी करताच, व्हिडिओ गेम खेळताना आरोपी या मुलाच्या संपर्कात होता. डिस्कॉर्ट या व्हिडिओ गेम खेळणाऱ्यांमध्ये प्रचलित असलेल्या प्लॅटफॉर्मवरून दोघेही एकमेकांच्या संपर्कात होते. त्या व्यक्तीने १२ वर्षांच्या मुलाकडून हा ईमेल आयडी तयार करून घेतल्याचे सांगितले. गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.