मुंबई : लग्नाला नकार देणाऱ्या मैत्रिणीचा पाठलाग करत, तिला धमकी देण्याचा प्रकार अंधेरीत घडला. या प्रकरणी आंबोली पोलिसांनी मंगळवारी एका इव्हेंट मॅनेजरला अटक केली. अॅन तिलवानी असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
तिलवानी हा गरिमा (नावात बदल) या तरुणीसोबत २०११ मध्ये मालाडच्या कंपनीत काम करत होता. गरिमाने वर्षभराने ती कंपनी सोडली. त्यानंतर, २०१५ साली फेसबुकवर ती तिलवानीच्या संपर्कात आली. एकमेकांना भेटणे सुरू झाले. मात्र, त्याला दारूचे व्यसन असल्याने गरिमाने संबंध तोडले. त्यानंतर, २०१६ मध्ये त्याने गरिमाला लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला. याचाच राग आल्याने तो तिचा पाठलाग करू लागला. तिला वारंवार फोन करू करून तिच्यासह कुटुंबीयांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकावू लागला. अखेर कंटाळून गरिमाने या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले. मात्र, तरीदेखील तिलवानी तिचा पाठलाग करत तिला त्रास देऊ लागला. याबाबत तिने आंबोली पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी मंगळवारी त्याला अटक केली. त्यानंतर, त्याची जामिनावर सुटका केली.