स्तनपान करतानाचे फोटो व्हायरल करण्याची धमकी, कुर्ल्यातील तरुणाची विकृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 03:26 AM2017-12-16T03:26:40+5:302017-12-16T03:26:56+5:30
एका विवाहित महिलेसोबत जवळीक साधण्यासाठी कुर्ल्यातील तरुणाने विकृतीचे टोक गाठल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्याने महिलेचे बाळाला स्तनपान करतानाचे फोटो काढले आणि मैत्री नाही केलीस, तर हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : एका विवाहित महिलेसोबत जवळीक साधण्यासाठी कुर्ल्यातील तरुणाने विकृतीचे टोक गाठल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. त्याने महिलेचे बाळाला स्तनपान करतानाचे फोटो काढले आणि मैत्री नाही केलीस, तर हेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. गेल्या सहा महिन्यांपासून त्याच्याकडून या महिलेला अशा पद्धतीने धमकावणे सुरू होते. अखेर महिलेने भीतीने घराबाहेर पडणेच बंद केले. पतीने तिला विश्वासात घेत याबाबत विचारणा केली, तेव्हा हा घटनाक्रम उघडकीस आला. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून नेहरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, विकृत तरुण पवन जैस्वालला बेड्या ठोकल्या.
कुर्ला परिसरात तक्रारदार विवाहिता पती आणि मुलासोबत राहते. बाजारात सामान आणण्यासाठी बाहेर पडलेल्या महिलेवर पवनची नजर पडली. ती बाजारात अथवा पाणी भरण्यासाठी बाहेर येताच, तो तिचा पाठलाग करत असे. तो तिच्या घरापर्यंत पोहोचला. सहा महिन्यांपूर्वी त्याने तिचे बाळाला स्तनपान करतानाचे फोटो चोरून काढले. याच फोटोच्या आधारे तिला धमकाविण्यास सुरुवात केली. ती बाजारात भाजी आणण्यासाठी बाहेर पडताच, त्याने मोबाइलमधील तिचे फोटो दाखविले. ‘दोस्ती कर, नाहीतर फोटो व्हॉट्स अॅपवर टाकेन,’ अशी धमकी दिली. त्यानंतर सातत्याने तो तिला बाहेर गाठून धमकी देत असे.
सुरुवातीला तिने त्याचे घर गाठून, त्याच्या कुटुंबीयांना सर्व प्रकार सांगून त्याला समजविण्यास सांगितले. तरीही त्याचा प्रताप सुरूच होता. त्याच्या भीतीने तिने घराबाहेर पडणे बंद केले. तिच्यातील बदल पतीच्या लक्षात आला. त्याने तिला विश्वासात घेत विचारणा केली. तेव्हा तिने झालेला प्रकार सांगितला.
महिलेला दमदाटी करीत मारहाण
गुरुवारी रात्री ८च्या सुमारास भाजी आणण्यासाठी बाहेर पडली. तेव्हा पवनने नेहमीप्रमाणे तिला गाठले आणि मोबाइलमधील फोटो दाखविले. तिने याबाबत पवनला खडसावले. याचा राग येताच, त्याने तिला मारहाण केली. हे समजताच कुटुंबीयांनी नेहरूनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मोहिते यांनी, पवनला विनयभंग, धमकावणे, मारहाण केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असून, ती मानसिक तणावाखाली आहे.