साडेतीनशे कोटी उपचारावर खर्च, तरी मुंबईचे रस्ते जखमीच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:09 AM2021-09-12T04:09:53+5:302021-09-12T04:09:53+5:30
भाजपच्या नगरसेवकाची मागणी गौरी टेंबकर - कलगुटकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डेरूपी ...
भाजपच्या नगरसेवकाची मागणी
गौरी टेंबकर - कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या सहा महिन्यांत मुंबईतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डेरूपी जखमा भरण्यासाठी जवळपास साडेतीनशे कोटी रुपये मुंबई महानगरपालिकेकडून खर्च करण्यात आले. इतक्या महागड्या उपचारानंतरही रस्ते जखमीच आहेत. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी भाजपचे नगरसेवक विनोद मिश्रा यांनी शनिवारी केली.
मुंबईतील एस व्ही रोड, लिंक रोड, दृतगती महामार्गसारख्या सर्व रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. दुरुस्तीच्या कामासाठी पालिकेने एकूण सात परिमंडळांत साडेतीनशे कोटी किमतीची कंत्राटे दिली होती. खड्डे अजूनही तसेच्या तसे आहेत. पालिकेने मुंबईकरांचे करस्वरूपात आलेले कोट्यवधी रुपये कंत्राटदारांना दुरुस्तीसाठी दिले. हे पैसे कोणाच्या खिशात गेले? याची चौकशी करण्याची मागणी मिश्रा यांनी पालिका आयुक्त इकबलसिंह चहल व महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली. रस्त्यावर ये-जा करणाऱ्या मुंबईकरांना या खड्ड्यांचा नाहक मनस्ताप भोगावा लागत असून, वेगवेगळ्या प्रकारची दुखणी त्यांच्या मागे लागल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे कंत्राटासाठी कोट्यवधी घेणाऱ्या कंत्राटदारांना तातडीने रस्त्यांवर उतरवून खड्डे बुजवून घेत यात भ्रष्टाचार झाल्यास कठोर कारवाई करा, असेही ते म्हणाले.
चार्ट बनवावा :
कार्य विभाग/ निविदाकाराचे नाव/ कंत्राट किंमत
परिमंडळ १ - मे. हिरानी इंटरप्रायझेस - ५७,९५,३०,०००
परिमंडळ २ - मे. आर्मस्ट्राँग (इंडिया) कन्स्ट्रक्शन - ५०,००,००,०००
परिमंडळ ३ - मे. प्रगती एंटरप्रायझेस - ५०,८७,४०,०००
परिमंडळ ४ - मे. कोणार्क स्ट्रक्चरल इंजिनिअर्स प्रा. लि. - ५७,४०,००,०००
परिमंडळ ५ - मे. लँडमार्क कॉर्पोरेशन प्रा. लि. - ५१,३५,४०,०००
परिमंडळ ६ - मे. वैभव एंटरप्रायझेस - ३१,५८,४०,०००
परिमंडळ ७ - मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स प्रा. लि. - ४६,४४,२०,०००
एकूण कंत्राट रक्कम : ०३,३६,०६,७०,०००