मुंबईत साडेतीन हजार व्यक्ती मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 02:55 AM2021-02-03T02:55:21+5:302021-02-03T02:56:12+5:30
Organ donation : मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अवयवदानाची प्रक्रिया ठप्प झाली. त्यानंतर आता पूर्वीच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व रुग्ण अनेक महिन्यांपासून प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याने नियमावलींचे पालन करून प्रत्यारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे.
मुंबई - मुंबईत गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अवयवदानाची प्रक्रिया ठप्प झाली. त्यानंतर आता पूर्वीच्या तुलनेत बाधितांचे प्रमाण कमी झाल्यामुळे व रुग्ण अनेक महिन्यांपासून प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असल्याने नियमावलींचे पालन करून प्रत्यारोपणाला सुरुवात करण्यात आली आहे. मागील वर्षांत केवळ ४५ मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्याची माहिती मुंबई जिल्हा विभागीय प्रत्यारोपण समितीने दिली आहे.
मुंबई जिल्हा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे कार्यकारिणी सदस्य डॉ. भरत शहा यांनी सांगितले, सध्या शहर उपनगरात ३ हजार ५०० व्यक्ती मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत आहेत. मागील वर्षी केवळ प्रत्यारोपणच नव्हे तर सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याची काही अंशी भीती कायम असल्याने आणि मुख्य म्हणजे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोनाग्रस्तांच्या सेवेसाठी एकवटल्या गेल्याने गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सर्वच दैनंदिन व नियमित उपचार प्रक्रिया तसेच शस्त्रक्रिया खंडित झाल्या होत्या. केवळ तातडीच्या उपचार-प्रक्रिया-शस्त्रक्रियांना प्राधान्य देण्यात येत होते.
अवयवदान म्हणजे काय?
जिवंतपणी किंवा मृत झाल्यानंतर आपले अवयव दुसऱ्या व्यक्तीला देणे म्हणजे अवयवदान! अवयवदान हे सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. जिवंत वा मृत व्यक्तीचा अवयव किंवा मानवी अवयवाचा काही भाग शस्त्रक्रियेद्वारे अलग करून तो गरजवंत रुग्णाच्या शरीरात बसवणे, या प्रक्रियेस अवयव प्रत्यारोपण असे म्हणतात. ज्यांचे अवयव कायमस्वरूपी निकामी झाले आहेत, अशा रुग्णांसाठी अवयवदान हाच एक आशेचा किरण असतो.
अवयवदान करायचेय?
हे जाणून घ्या...
संबंधित दात्याने जिवंतपणी किंवा त्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारसदाराने लेखी स्वरूपात तसे नमूद केलेले असावे, असा भारतीय कायद्याचा दंडक आहे. अवयवदानासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. दात्याला विहित नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागतो. हा अर्ज कोणत्याही सरकारी रुग्णालयात किंवा मोठ्या खासगी रुग्णालयात उपलब्ध असतो.